ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 06:25 PM2024-10-14T18:25:02+5:302024-10-14T18:29:51+5:30
Hikmat Udhan Vidhan Sabha 2024: विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल अशी स्थिती असून, जालना जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: शिवसेनेतील फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या हिकमत उढाण यांनी सोमवारी (१४ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत हिकमत उढाण हे सह-संपर्कप्रमुख होते. ठाकरेंचे शिवबंधन तोडत त्यांनी विधानसभा निवडमुकीच्या तोंडावर शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांची चिंता वाढली आहे. कारण उढाण हे टोपेंचे कट्टर राजकीय विरोधक आहेत.
राजेश टोपे विरुद्ध हिकमत उढाण?
विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात इच्छुक अंदाज घेऊन पक्ष बदलताना दिसत आहे. हिकमत उढाण यांनीही आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या हिशोबाने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.
२०१९ मध्ये हिकमत उढाण यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राजेश टोपे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. शिवसेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या हिकमत उढाण यांचा फार कमी मतांनी पराभव झाला होता. यावेळीही ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, पण राजेश टोपे विद्यमान आमदार असल्याने ही जागा शरद पवारांकडे जाणार हे निश्चित आहे.
हिकमत उढाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. हिकमत उढाण घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरल्यास राजेश टोपे यांना निवडणूक जड जाऊ शकते. कारण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे यांचा अवघ्या तीन हजार मतांनी विजय झाला होता.
राजेश टोपे यांना १,०७,८४९ मते मिळाली होती. तर शिवसेनेचे हिकमत उढाण यांना १,०४,४४० मते मिळाली होती. ३,४०९ मतांनी हिकमत उढाण यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विष्णू शेळके यांना ९,२९३ मते मिळाली होती.
गोळी थेट डोक्यात लागणार; हिकमत उढाण
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा उल्लेख न करता हिकमत उढाण यांनी यावेळी विजय मिळवणारच, असे संकेत दिले. पक्षप्रवेशावेळी ते म्हणाले, "मला आज खूप बोलायचं होतं, पण साहेबांनी मला पाच मिनिटांचा वेळ दिला होता. २०१९ मध्ये गोळी कानावरून गेली. यावेळी आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांना शब्द देतो... यावेळी गोळी कानावरून जाणार नाही, तर गोळी थेट डोक्यात घुसेल. शेवटी एकच सांगतो की, जखमी हुआ तो क्या हुआ, टायगर अभी जिंदा है", असा इशारा हिकमत उढाण यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना पक्षप्रवेशावेळी दिला.