गोड उसाची दाहक कहाणी; शेतकरी पती-पत्नीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 01:30 PM2022-05-27T13:30:25+5:302022-05-27T13:37:27+5:30
बऱ्याच वेळा साखर कारखान्याकडे विनवण्या केल्या. परंतु, कारखाना ऊस तोड करायला तयार नाही.
जालना: शेतातील ऊस तोडणी अभावी वाळत असल्याने शेतकरी पती-पत्नीने टोकाचा निर्णय घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. मोठ्या आशेने वाढवलेल्या उसाची विनवणी करूनही साखर कारखाना तोडणी करायला तयार नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने गोड उसाची आणखी एक दाहक कहाणी पुढे आली आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोदगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी सुभाष सराटे यांनी यंदा ८ एकरवर ऊस लागवड केली आहे. जीवाचे रान करून त्यांनी पत्नी मीरासोबत उसाची निगा राखली, आता कारखान्याला ऊस जाईल आणि कष्टाचे पैसे मिळेल या आशेवर दोघे होते. मात्र, ऊस तोडणी करण्यासाठी कारखाना टोळीच पाठवत नसल्याने ते हतबल झाले.
बऱ्याच वेळा साखर कारखान्याकडे विनवण्या केल्या. परंतु, कारखाना ऊस तोड करायला तयार नाही. त्यामुळे आलेल्या विवंचनेतून पती-पत्नीने आज थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. काही कळायच्या आत दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दोघांनी सोबत आणलेली किटकनाशकाची बाटली तोंडला लावत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. ही बाब तिथे असलेल्या पोलिसांनी पाहताच प्रसंगावधान राखत कदम पती-पत्नीला त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या कडील कीटकनाशकाची बॉटल पोलिसांनी वेळीच हिसकावून घेतल्यानं पुढील अनर्थ टळला.