भरधाव वेगात बसचालकाचा बीपी झाला हाय : प्रसंगावधान राखल्याने वाचला प्रवाशांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 08:33 PM2023-05-21T20:33:58+5:302023-05-21T20:34:27+5:30
...तर घडली असती मोठी दुर्घटना
महेश गायकवाड
जालना : अंबड आगारातून कुंभार पिंपळगाव मार्गे गुंजकडे ६० ते ७० प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचालकाचे ब्लड प्रेशर अचानक वाढले. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने बसवरील नियंत्रण सुटून एसटी बस एका मंगल कार्यालयाला धडकणार होती. परंतु, चालकाने अशा स्थिती प्रसंगावधान राखत बसचे ब्रेक दाबून बस थांबवली. त्यामुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला. कुंभार पिंपळगाव- गुंज रस्त्यावर रविवारी दुपारी ही घटना घडली.
रविवारी अंबड आगारातून ६० ते ७० प्रवासी घेऊन एक बस गुंजकडे निघाली होती. ही बस कुंभार पिंपळगाव येथून जात असताना गणेश कंटुले नावाच्या युवकाला बस नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आले. यावेळी प्रवाशांनाही चालकाने सीटवर मान टाकल्याचे दिसून आले. त्यामुळे बसमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली होती. ही बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यंकटेश मंगल कार्यालयाजवळ थांबली. यावेळी बस चालकास रक्ताची उलटी झाल्याचे निदर्शनास आले. प्रवाशांनी तातडीने स्थानिकांच्या मदतीने त्यांना ताबडतोब कुंभार पिंपळगाव येथील डॉ. गणेश तौर यांच्याकडे दाखल केले. त्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना घनसावंगी शहरात हलवले. त्यांचा बीपी वाढल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे डॉ. तौर यांनी सांगितले.
तर घडली असती मोठी दुर्घटना
नियंत्रण सुटलेल्या बसवर ताबा मिळवता आला नसता तर रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रान्स्फॉर्मरवर किंवा रस्त्याच्या खाली असलेल्या खड्ड्यात ही बस पलटी झाली असती. सुदैवाने चालकाने हृदयविकाराचा झटका येऊनही बस थांबविण्याचे साहस दाखविल्यामुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला. मी शेतातून घरी जात असताना ही बस नियंत्रणाच्या बाहेर असल्याचे लक्षात आले. मी कसेबसे स्वतःला वाचवले. घटनास्थळी जाऊन पाहिल्यावर चालकाला रक्ताची उलटी झाल्याचे दिसले. प्रवाशांच्या मदतीने चालकाला कुंभार पिंपळगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गणेश कंटुले, प्रत्यक्षदर्शी