मत्स्योदरी देवीच्या मंदिरातील सीसीटीव्ही बंद पडले, दुसऱ्याच दिवशी दानपेटी फोडून लाखो लंपास
By दिपक ढोले | Published: July 21, 2023 05:11 PM2023-07-21T17:11:35+5:302023-07-21T17:12:28+5:30
मराठवाड्याचे आराध्य दैवत म्हणून अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी प्रसिध्द आहे.
अंबड (जि.जालना) : चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून कटरच्या साह्यायाने दानपेटी उघडून लाखोंची रूपयांची रोकड लांबविल्याची घटना अंबड शहरातील मत्स्योदरी देवीच्या मंदिरात शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. विशेष म्हणजे, गुरूवारीच तांत्रिक अडचणीमुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने आश्यर्च व्यक्त केले जात असून, पोलिसांसमोर चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान असणार आहे. काही महिन्यांपूर्वी जांबसमर्थ येथील मंदिरात चोरी झाली होती. तेव्हापासून जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे.
मराठवाड्याचे आराध्य दैवत म्हणून अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी प्रसिध्द आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे अनेक भाविक दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणात दान करतात. गुरूवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पुजारी मंदिर बंद करून घरी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री मंदिरात प्रवेश केला. कटरच्या साह्यायाने मंदिराची दानपेटी उघडली. त्यातील जवळपास चार लाख रूपये लंपास केले. शुक्रवारी सकाळी पुजाऱ्याने मंदिर उघडले असता, तेव्हा गाभाऱ्याचा दरवाजा उघडलेला दिसला. शिवाय, दानपेटी जागेवरून बाजूला झालेली लक्षात आले. त्यांनी याची माहिती व्यवस्थापकांना दिली. याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी श्वान पथकासह ठस्से तज्ज्ञांना प्राचारण करण्यात आले होते.
पोलिस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक तुषार दोषी, उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, आदिनाथ ढाकणे, जे. एस. कसबे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.