केंद्रीय पथकाचा मंठा तालुक्यात धावता दौरा, चार गावांतील पिकांची केली पाहणी
By शिवाजी कदम | Published: December 14, 2023 05:12 PM2023-12-14T17:12:06+5:302023-12-14T17:12:27+5:30
केंद्रीय कृषी मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांचा पथकात समावेश
मंठा: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रिय पथक जालना जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे. गुरुवार रोजी दुपारी अंदाजे दोन तासात मंठा तालुक्यातील चार गावांचा दौरा करून हे पथक रवाना झाले. केंद्रीय कृषी कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तालुक्यातील चार गावात पिकांची पाहणी करून पथक परतल्याचे दिसून आले.
यंदाचा खरीप हंगाम संपल्यानंतर वराती मागून घोडे म्हणल्या सारखे रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्यावर पथक पाहणीसाठी धडकले आहे. पथकातील अधिकाऱ्यांनी वाढेगाव, पांढुर्णा, पिंपरखेडा येथील कोरड्या पडलेल्या पाझर तलावाची पाहणी केली. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी मेसखेडा,जाटखेडा येथील कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन कापूस, ऊस, तूर ,ज्वारी, हरबरा सह इतर पिकांची पाहणी केली.