मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्यातच गेला अंतरवाली सराटीत ग्रामस्थांचा दिवस
By विजय मुंडे | Published: September 13, 2023 08:23 PM2023-09-13T20:23:34+5:302023-09-13T20:23:55+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांची बैठक झाल्यानंतर बैठकीतील निर्णय, ठरावांचा निरोप मनोज जरांगे यांना देण्यात आला होता.
जालना : अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांसह स्वयंसेवकांची फौजही तैनात करण्यात आली. परंतु, सायंकाळी ७ वाजले तरी उपोषणस्थळी ना शिष्टमंडळ आले ना मुख्यमंत्री. यामुळे दिवसभर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह शिष्टमंडळाची वाट पाहण्यातच अंतरवाली सराटी ग्रामस्थांचा दिवस गेल्याचे दिसून आले.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांची बैठक झाल्यानंतर बैठकीतील निर्णय, ठरावांचा निरोप मनोज जरांगे यांना देण्यात आला होता. त्यानुसार मनोज जरांगे यांनी समाजबांधवांच्या सहमतीने शासनाला आरक्षणासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. परंतु, ही मुदत देताना पाच अटी घातल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, संबंधित अधिकाऱ्यांसह छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती उदयनराजे भोसले यांना घेऊन यावे. दिलेल्या आश्वासनांबाबत लेखी द्यावे, अशी मागणी केली होती. असे झाले तर आमरण उपोषण मागे घेऊन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप होईपर्यंत इथेच साखळी उपोषण करू, अशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. परंतु, सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री, अधिकारी येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपोषणस्थळी ना शिष्टमंडळ आले ना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले. त्यामुळे उपोषणस्थळी उपस्थित नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगल्या होत्या. शिवाय मंत्री आणि शिष्टमंडळाची वाट पाहण्यातच अनेकांचा दिवसही गेला.
मुख्यमंत्री येणारच : जरांगे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी येऊ, असे आपल्याला सांगितले आहे. बुधवारी ते येणार याबाबत अधिकृत निरोप मला नव्हता. परंतु, मुख्यमंत्री उपोषणस्थळी येणार, असा आपल्याला विश्वास असल्याचे मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.