नालीचे निकृष्ट काम बैलाच्या जिवावर बेतले; ढापा तुटून बैल थेट पडला नालीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 05:03 PM2024-08-17T17:03:30+5:302024-08-17T17:19:41+5:30

नालीत पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यासाठी अखेर जेसीबी आणावा लागला

The dhapa on the highway broke and the bull fell directly into the drain; Drainage work on both sides is of poor quality | नालीचे निकृष्ट काम बैलाच्या जिवावर बेतले; ढापा तुटून बैल थेट पडला नालीत

नालीचे निकृष्ट काम बैलाच्या जिवावर बेतले; ढापा तुटून बैल थेट पडला नालीत

भोकरदन( जालना) : भोकरदन शहरातील भोकरदन-जालना रस्त्याच्या बाजूने सुरू असलेल्या नालीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. आज दुपारी नालीवर टाकण्यात आलेला ढापा बैलाच्या वजनाने तुटला अन् बैल थेट नाल्यात पडल्याची घटना घडली. नालीत पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यासाठी अखेर जेसीबी आणावा लागला होता.

राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना अंतर्गत भोकरदन शहरातून जालनाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाचे सुध्दा बांधकाम करण्यात येत आहे.  त्यामुळे शहरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आज आठवडी बाजार असल्याने शहरात गर्दी होती. जुन्या जिल्हापरिषद शाळेच्या समोरून जाताना बैलाच्या वजनाने नाल्यावरील ढापा तुटला. यामुळे एक बैल नाल्यात पडला. नागरिकांनी बैलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश आले. शेवटी बैल बाहेर काढण्यासाठी जेसीबी मागवण्यात आला.  जेसीबीच्या मदतीने बैलाला बाहेर काढण्यात आले. 

दरम्यान, केवळ बैलाच्या वजनाने ढापा तुटून असे अपघात होत असतील तर यावरून मोठी वाहने गेल्यास काय होईल? याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. नाला कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद आढळून आला. 

Web Title: The dhapa on the highway broke and the bull fell directly into the drain; Drainage work on both sides is of poor quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.