भांडणातून संसार उद्ध्वस्त, पत्नीच्या खुनानंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 02:17 PM2023-02-02T14:17:21+5:302023-02-02T14:17:33+5:30
पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच पतीने कीटकनाशक प्राशन केले
- फकिरा देशमुख
भोकरदन( जालना) : पत्नीचा खून करून पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील पळसखेड मूर्तड येथे घडली. संगीता अर्जुन सोनुने असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री भांडणानंतर पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला.
पळसखेड मूर्तड येथील अर्जुन चांगो सोनुने (55) हे पत्नी संगिता 14 वर्षाच्या मुलासह वरुड बु शिवारातील स्वतःच्या शेतात राहतात. 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सोनुने पतीपत्नीत कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या पतीने दगड मारल्याने संगिताबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना शेजाऱ्यांनी पिंपळगाव रेणुकाई येथे दवाखान्यात आणले. येथे प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून संगीताबाई यांना मृत घोषित केले.
दरम्यान, पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच अर्जुन सोनुनेने आज सकाळी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलिस ठाण्याचे सपोनि रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक बजरंग कोटुंबरे, अरुण वाघ, मिलिंद सुरडकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.