शेतकऱ्याने स्वत:ला घेतले गाडून, लालफितीच्या कारभारात बळीराजाचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:27 AM2023-01-03T08:27:24+5:302023-01-03T08:33:16+5:30
दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा, म्हणून अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा केला
जालना/मंठा - हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, असं मुख्यमंत्री नेहमीच सांगतात. मात्र, एका शेतकऱ्याला स्वत:च्या हक्कासाठी चक्क जमिनीत गाडून घ्यावं लागलं. हेलस येथील शेतकरी सुनील जाधव यांनी सोमवारी सकाळी स्वत:ला जमिनीत गाडून अनोखे आंदोलन केले. यावेळी शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच, जोपर्यंत शासन जमिनीचा ताबा देत नाही, तोपर्यंत मी येथून उठणार नाही, असेही शेतकरी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा मिळावा, म्हणून अनेकवेळा शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु, तरीही जमीन मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी अशाप्रकारचे आंदोलन करत प्रशासनाने लक्ष वेधले आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेतून कौसल्याबाई जाधव व नंदाबाई सदावर्ते यांना गट नं. ४०१ मधील प्रत्येकी १ हेक्टर ३५ आर जमिनी मिळाली होती. या जमिनीचा ताबा मिळावा, यासाठी २०१९ पासून पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी जाधव यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना अनेकवेळा निवेदन दिली. परंतु, अद्यापही जमिनीचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी सुनील जाधव यांनी सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हेलस शिवारात स्वतःला जमिनीत गाडून आंदोलन केले आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा शेतकऱ्याने घेतला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री सांगतात. अधिवेशनातही शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सरकार निर्णय घेत असल्याच्या घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती वेगळीच पाहायला मिळले. जालन्यातील एका सर्वसामान्य शेतकऱ्याचं हे दु:ख राज्यातील हजारो नागरिकांचे प्रतिनिधित्व करतेय हेही तितकेच सत्य आहे.