शेतकऱ्याचा मुलगा झाला फौजदार; हलाखीच्या परिस्थितीवर जिद्दीने केली मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 07:06 PM2022-03-12T19:06:37+5:302022-03-12T19:07:08+5:30
आडगाव भोंबे येथे असलेल्या दोन एकर जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
हिसोडा ( जालना ) : घरची परिस्थिती हलाखीची. औरंगाबाद येथे अभ्यासिका लावून जिद्दीला परिश्रमाची जोड देत यश संपादन करून भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे येथील शेतकऱ्याचा मुलगा फौजदार बनला आहे. दयानंद भोंबे असे त्या मुलाचे नाव आहे.
श्रीरंग भोंबे यांची परिस्थिती हालाखीची. आडगाव भोंबे येथे असलेल्या दोन एकर जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. या हलाखीच्या परिस्थितीवरून मात करण्यासाठी दयानंदला काही तरी करायचे होते. त्याने या जिद्दीच्या जोरावरच शिक्षण घेत असतानाच भोकरदन येथे काम केले. त्यानंतर पदवी घेण्यासाठी औरंगाबादला गेला. त्याला पोलीस खात्यात नोकरी करायची इच्छा असल्याने तो कामाला लागला.
अभ्यासिका लावून त्याने अभ्यास सुरू केला. त्याचे वडील श्रीरंग भोंबे उसनवारी करून त्याला पैसे पाठवायचे. त्यानेही जिद्द व चिकाटीच्या जोरावर ११ ते १२ तास अभ्यास केला. २०१९ मध्ये त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. नुकताच त्याचा निकाल जाहीर झाला असून, यात अमोलने घवघवीत यश संपादन केले आहे. त्याला या परीक्षेत ३०० पैकी २५८ गुण मिळाले आहे. राज्यात तो बाराव्या स्थानी आहे. त्याचा नुकताच गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवाय, गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली. शिवाय, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
खचून न जाता अभ्यास करा
आई-वडिलांनी शेती व मोलमजुरी करून मला शिक्षणासाठी पैसे दिले आहे. मी ही रात्रंदिवस जागून अभ्यास केला. त्याचे फळ मला मिळाले आहे. तरूणांनी ही खचून न जात अभ्यास करून जीवनात यशस्वी झाले पाहिजे.
- दयानंद भोबे, पोलीस उपनिरीक्षक