"खोटे आश्वासन देऊन सरकारने मराठा समाजाला फसवले"; ओमराजे निंबाळकर जरांगेंच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 07:45 PM2024-06-12T19:45:44+5:302024-06-12T19:46:56+5:30
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांची गाडी मराठा महिलांनी अडवली.
वडीगोद्री ( जालना) : सरकारने खोटे आश्वासन देऊन एका पद्धतीने फसवणूक केल्याची मराठा समाजाची मानसिकता तयार झाली आहे. सरकारने तातडीने मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेऊन तातडीने पावलं उचलली पाहिजेत, असे आवाहन धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले. खासदार निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी आज दुपारी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले नेते मनोज जरांगे यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर उपोषण असलं तरी पाणी घेणे गरजेचे आहे, अशी विनंती जरांगे यांना खासदार निंबाळकर यांनी केली.
पुढे खासदार निंबाळकर म्हणाले, प्रत्येक गोष्ट राजकारणाकडे नेणं योग्य वाटत नाही. जरांगे हे समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत. या माणसाचा अखंडपणे समाजासाठी लढा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे आपण राजकारण म्हणून बघितलं नाही पाहिजे. केंद्र सरकारला मी वारंवार विनंती करतो की, तामिळनाडू भारतातील राज्य असून तिथे ५० टक्केची आरक्षण मर्यादा ओलंडली आहे, ते आरक्षण टिकतं आपल्याकडे का टिकू शकत नाही ? सगळं समजून सुद्धा असा प्रकार केला जातो. तो चीड आणणार आहे. यामुळे समाजात रोष निर्माण होतो. याबाबत सरकारने मार्ग काढावा यासाठी पूर्ण ताकतीने आम्ही मागे लागू असे आश्वासनही खासदार निंबाळकर यांनी यावेळी दिले.
मराठा महिलांनी अडवली खासदार निंबाळकर यांची गाडी
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांची गाडी मराठा महिलांनी अडवली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सभागृह बंद पाडून मराठा आरक्षण देण्यास भाग पाडावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.