उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 06:53 PM2024-06-18T18:53:59+5:302024-06-18T18:54:53+5:30
डॉक्टरांकडून उपचार घेण्याची विनंती; उपचारास उपोषणकर्त्यांचा नकार
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. दोघांचीही जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकाने वैद्यकीय तपासणी केली. दोन्ही आंदोलकांचे ब्लड प्रेशर चांगल आहे. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना भोवळ येत आहे. उपचाराची विनंती केली असता उपचार घेण्यास दोघांनी नकार दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. दरम्यान, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवत असताना सरकार दखल घेत नसल्याचा आरोप करत आज सायंकाळी ६. १५ मिनिटांनी आंदोलकांनी धुळे- सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे रस्तारोको सुरू केला आहे.
धुळे-सोलापूर महामार्गावर वडीगोद्री येथे ओबीसी बांधवांनी रस्त्यावर येऊन रास्तारोको सुरू केला आहे. हे जातीवादी मुख्यमंत्री आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी केला. उपोषणकर्ते जीवाचं रान करत आहेत, त्यांचा बीपी सुद्धा वाढलेला आहे. तरीसुद्धा सरकार कुठलीही भूमिका घेत नसल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. आंदोलकांनी अचानक रस्तारोको सुरू केल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. पोलिस आंदोलकांना समजविण्याच्या प्रयत्न करत आहेत. मात्र, आंदोलक रस्त्यावर बसून आहेत. काही आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.
ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासनाचा घाट
मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासनाचा घाट असून लोकनियुक्त सरकार राज्यघटनेशी धोका करत आहे, असा सनसनाटी आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज केला. तसेच तुम्ही राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रतिनिधी की एका विशिष्ट समाजाचे? असा सवाल देखील हाके यांनी मुख्यमंत्र्यांना केला. तसेच सगेसोयरेचा अध्यादेश लागू झाला तर फक्त ओबीसी बाधित होत नाही, तर एससी आणि एसटी यांच्या आरक्षणावर पण गदा येते. शासन जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही हे सांगत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार, असा पुनरोच्चार देखील हाके यांनी केला.
शांततेत आंदोलन करा; हाके यांच्या विनंतीनंतर रस्ता मोकळा
धुळे -सोलापूर महामार्ग वडीगोद्री येथे आक्रमक ओबीसी आंदोलकांनी रोखल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळत राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी दखल घेतल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांत झटापट झाली. दरम्यान, ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला.
उपोषणाला वाढता पाठिंबा
उपोषाकर्त्यांच्या मागणीला पाठिंबा वाढत असून अनेक ठिकाणाहून आंदोलक उपोषणस्थळी दाखल होत आहेत. तसेच अनेक पक्ष संघटना देखील आपला पाठिंबा दर्शवत उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्याशी फोनवर चर्चा करून प्रकृतीची विचारपूस करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच माझा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा असून मी लवकरच तुमची भेट घेणार आहे असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. त्याचं बरोबर शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही आंदोलकांशी फोनद्वारे चर्चा करून प्रकृतीची विचारपूस केली.