चूल पेटली; पण जेवण जाईना, सरकार लवकर निर्णय घ्या...; ग्रामस्थ आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 12:00 PM2023-09-04T12:00:35+5:302023-09-04T12:01:07+5:30
‘व्हीआयपीं’च्या गर्दीने दमछाक
- पवनराजे पवार
वडीगोद्री (जि. जालना) : मंत्री येताहेत, खासदार येताहेत अधिकारीही येताहेत. ‘व्हीआयपीं’च्या गर्दीने ग्रामस्थांचीच नव्हे प्रशासनाचीही दमछाक होतेय. उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची काळजी वेगळीच आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाटतेय. गावातील चूल पेटली आहे; पण जेवण जाईना, सरकार काही लवकर निर्णय घेईना, अशा हताश प्रतिक्रिया अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथील उपोषणकर्ते, ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सहाव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या लाठी हल्ल्यानंतर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. लाठीहल्ल्याच्या घटनेनंतर तिसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासूनच अंतरवाली सराटी गावात विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी येत होते. जरांगे यांच्यासह जखमी झालेले नागरिक, महिलांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली जात होती. दिवसभर मंत्री, नेतेमंडळी, विरोधी पक्षाचे नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांची गावात हजेरी सुरू होती. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले होते. गावात भीतीचे वातावरण लाठीहल्ला, वाढलेले व्हीआयपींचे दौरे आणि त्यांच्यासोबत असणारा पोलिसांचा फौजफाटा यांमुळे ग्रामस्थांमध्ये आजही भीतीचे वातावरण आहे.
आज अतिरिक्त पोलिस महासंचालक चौकशीसाठी येणार
लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना हे सोमवारी जालना शहरात येणार आहे. अंतरवाली सराटी गावाला भेट देऊन ते सर्व बाजूंची चौकशी करून अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देणार आहेत. चौकशीसाठी आमच्याकडून पूर्णपणे मदत केली जाईल, अशी माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
कोटगावात आज शांतता आहे. आम्हाला आरक्षणाचा फायदा होईल माहिती नाही; परंतु, आमच्या पुढील पिढीला नक्की होईल. शासनाने योग्य निर्णय दोन दिवसांत घ्यावा. - नंदकुमार तारख, ज्येष्ठ नागरिक
आरक्षण शांततेत सुरू असताना पोलिसांनी अचानक लाठीहल्ला, गोळीबार केला आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. माझी सून, मुलगा गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत आहोत. - अलकनंदा तारख, ज्येष्ठ महिला
आमच्या बांधवांवरील गुन्हे मागे घ्यावेत. पोलिसांनी आमच्यावर जो लाठीचार्ज व गोळीबार केला, यात अनेकजण जखमी झाले आहेत. ग्रामस्थांना मारहाण करणाऱ्यांना बडतर्फ करावे आणि तातडीने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात.
- आनंद तारख, तरुण