घरफोडीच्या तपासासाठी गेलेल्या पोलिसाचेच घरफोडले, १० लाखांचा मुद्देमाल लंपास
By दिपक ढोले | Published: September 5, 2022 06:08 PM2022-09-05T18:08:53+5:302022-09-05T18:09:22+5:30
कपाटाचा दरवाजा उघडून एका डब्ब्यामध्ये ठेवलेले आठ लाख ७५ हजार रूपये किंमतीचे साडे सतरा तोळ्याचे दागिने व रोख रक्कम एक लाख ८० हजार असा १० लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.
जालना : बोरी येथील घरफोडीच्या तपासासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे घरफोडल्याची घटना रविवारी रात्री अंबड शहरातील शारदानगर येथे घडली. चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह जवळपास १० लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी अंबड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मधुकर त्र्यबंकराव पाटील हे कुटुंबासह अंबड शहरातील शारदानगर येथे राहतात. महालक्ष्मीच्या सणामुळे त्यांचे कुटुंब बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात मधुकर पाटील हे एकटेच होते. रात्री उशिरा अंबड तालुक्यातील बोरी येथे घरफोडी झाल्याची माहिती त्यांना मिळाली. ते तत्काळ घटनास्थळी गेले. हीच संधी साधून चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे व चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
कपाटाचा दरवाजा उघडून एका डब्ब्यामध्ये ठेवलेले आठ लाख ७५ हजार रूपये किंमतीचे साडे सतरा तोळ्याचे दागिने व रोख रक्कम एक लाख ८० हजार असा १० लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. पाटील हे सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घरी आले असता, त्यांना चॅनल गेटसह घराचा दरवाजा उघडा दिसला. घरामध्ये जाऊन पाहणी केली असता, त्यांना चोरी झाल्याचे कळाले. त्यांनी तात्काळ अंबड पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. घटनास्थळी श्वान पथक व ठस्से तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक हुंबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरके यांनी भेट दिली आहेत.