अंतरवाली सराटी लाठीचार्जच्या चौकशीला झाली सुरुवात, अप्पर पोलीस महासंचालक जालन्यात
By दिपक ढोले | Published: September 4, 2023 03:39 PM2023-09-04T15:39:08+5:302023-09-04T15:40:37+5:30
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अप्पर महासंचालकांची भेट घेतली आहे.
जालना : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीला अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी सोमवारपासून सुरुवात केली आहे. त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची चौकशी केल्याचे सांगण्यात आले आहे.
अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यात अनेक आंदोलक आणि पोलिसही जखमी झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांना दिले आहेत. सक्सेना हे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयात आले. त्यांनी सुरुवातील विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, सीआयडीचे प्रमुख पंकज देशमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेतली. साडेअकरा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत त्यांनी या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्व प्रकरण समजून घेतले. त्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि इतर अधिकाऱ्यांची चौकशी केल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे.
मी चौकशी करण्यासाठी आलो
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, मी चौकशी करण्यासाठी जालन्यात आलो आहे. चौकशीला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्यातील वातावरण पाहता, कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
- संजय सक्सेना, अतिरिक्त पोलिस महासंचालक
मोठी बातमी:'मला वरिष्ठांनीच लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले'; अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती
काय घडले होते ?
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसले होते. १ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पोलिस त्यांना आणण्यासाठी पोलीस गेले होते. त्याचवेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. हवेत गोळीबारही करण्यात आला. याचे पडसाद राज्यभरात उमटले असून, अनेकठिकाणी जाळपोळ झाली. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. तर अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे आणि डीवायएसपींच्या बदलीच्या सूचना दिल्या आहेत.