१५ दिवसांपासून पाळत ठेऊन व्यापाऱ्यास लुटले; पाच जणांची टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:46 PM2022-05-13T18:46:56+5:302022-05-13T18:47:09+5:30
स्थानिक गुन्हे शाखा व सदर बाजार पोलिसांनी केली कारवाई
जालना : चार दिवसांपूर्वी व्यापाऱ्याला मारहाण करून गावठी कट्ट्याचा धाक दाखवून सात लाखांना लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केले आहे. अतिक शेख याकूब शेख (२१), फेरोज खान सलीम खान (२२, दोघे रा. कन्हैया नगर), भोल्या भीमराव निकाळजे (२७), राहुल विष्णू मुळेकर (२५), शेख सलीम शेख शमशोद्दीन (२३, तिन्ही रा. लालबाग, जालना), अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून स्कूटी, रोख रक्कम व मोबाइल, असा २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
९ मे २०२२ रोजी अमित अशोककुमार अग्रवाल या व्यापाऱ्याला मारहाण करून गावठी कट्ट्याचा धाक दाखवून रात्री सात वाजेच्या सुमारास गोल्डन जुबिली शाळेजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी लुटले होते. चोरट्यांनी रोख रक्कम सहा लाख ९२ हजार ३०० व स्कूटी लंपास केली होती. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना माहिती मिळाली की, हा गुन्हा अतिक शेख याकूब शेख, फेरोज खान सलीम खान यांनी त्यांच्या तीन साथीदारांसह केला आहे. या माहितीवरून त्यांना कन्हैया नगर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांना साथीदारांबाबत विचारले असता, भोल्या निकाळजे, राहुल मुळेकर, शेख सलीम शमशोद्दीन या तिघांसोबत केल्याची कबुली दिली. तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून स्कूटी, रोख रक्कम, मोबाइल व एक हातोडा, असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१५ दिवसांपूर्वीच आखला प्लॅन
आरोपी अतिक शेख, फेरोज खान हे नवीन मोंढा येथे हमालीचे काम करतात. १५ दिवसांपूर्वीच त्यांनी हा प्लॅन आखला होता. आरोपी अतिक शेख याने व्यापारी अमित अग्रवाल यांच्यावर पाळत ठेवली. व्यापारी अग्रवाल हे घराकडे रक्कम घेऊन जाताच, त्याने तिघांना इशारा केला. त्यानंतर त्यांना मारहाण करून लुटण्यात आले आहे.