विहिरीतील पाणी उपसण्याच्या कारणावरून चुलत्यानेच केला पुतण्याचा खून
By दिपक ढोले | Published: July 4, 2023 08:58 PM2023-07-04T20:58:38+5:302023-07-04T21:00:01+5:30
नातेवाइकांनी सुनील यास जखमी अवस्थेत घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
जालना: विहिरीतील पाणी उपसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चुलत्याने पुतण्याचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील देवनगर तांडा येथे सोमवारी रात्री उशिरा घडली. सुनिल प्रकाश पवार (२३), असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी मंगळवारी घनसावंगी पोलिस ठाण्यात तिघांवर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवनगर तांडा येथे सुनिल प्रकाश पवार हा पत्नी, यशोदा (२३), आई बबिता व अडीच वर्षांच्या मुलासह राहतो. शेजारीच त्याचा चुलता संशयित प्रल्हाद नामदेव पवार याचे घर आहे. दोघांमध्ये शेतातील विहिरीच्या पाण्यावरून सतत वाद सुरू होते. सोमवारी सायंकाळी आठ वाजता सुनिल पवार हा कुटुंबियांसह घरी असताना, त्याचा पत्नी यशोदासोबत घरात पिण्यासाठी पाणी नसल्याच्या कारणावरून वाद झाला. तेव्हा घराशेजारी राहणारा संशयित प्रल्हाद पवार, त्याची पत्नी व वडील नामदेव पवार हे तिथे आले.
प्रल्हाद पवार याने तू विहिरीच्या पाण्यावरून कुणाला शिवीगाळ करतो, असे म्हणून वाद घालायला सुरुवात केली. तेव्हा सुनील याने आज विहिरीतील पाणी भरण्याची आमची बारी असताना तुम्ही विहिरीचे पाणी उपसले, आता घरी पिण्यास पाणी नाही, असे सांगत असताना, प्रल्हाद पवार याने पुतण्या सुनील यास घराच्या ओट्यावरून खाली ओढले. आज तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणत पत्नी व वडिलांना त्याला पकडून ठेवण्यास सांगितले. नंतर कंबरेचा चाकू काढून सुनील याच्या पोटात, मानेवर, हाता-पायांवरसपासप वार केले. पतीला वाचविण्यासाठी गेेलेल्या यशोदासह तिच्या सासूलाही ढकलून दिले. दरम्यान, चाकू हल्ल्यात जखमी सुनील पवार हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिक घटनास्थळाकडे धावले. तेव्हा प्रल्हाद पवार हा घटनास्थळावरून पळून गेला. नातेवाइकांनी सुनील यास जखमी अवस्थेत घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
तिघांविरुध्द गुन्हा दाखल
या प्रकरणी मृत सुनील याची पत्नी यशोदा हिने मंगळवारी घनसावंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित प्रल्हाद नामदेव पवार, त्याची पत्नी व नामदेव सीताराम पवार यांच्या विरुध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन हे करीत आहेत. संशयित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोनि. महाजन यांनी दिली.