अंतरवाली सराटीत उद्या मराठा आरक्षणावर महत्वपूर्ण बैठक; जरांगे जाहीर करणार पुढील दिशा

By विजय मुंडे  | Published: December 16, 2023 07:41 PM2023-12-16T19:41:44+5:302023-12-16T19:42:53+5:30

अंतरवाली सराटीत महत्वपूर्ण बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील जाहीर करणार भूमिका

The next direction of the Maratha reservation movement will be tomorrow; Manoj Jarange will announce the role after the meeting | अंतरवाली सराटीत उद्या मराठा आरक्षणावर महत्वपूर्ण बैठक; जरांगे जाहीर करणार पुढील दिशा

अंतरवाली सराटीत उद्या मराठा आरक्षणावर महत्वपूर्ण बैठक; जरांगे जाहीर करणार पुढील दिशा

वडीगोद्री (जि.जालना) : महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यामागणीसाठी शासनाला २४ डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा काय असावी यावर चर्चा करण्यासाठी रविवारी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. समाज बांधवांशी संवाद साधून मनोज जरांगे पाटील आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांची १४ ऑक्टोबर रोजी ज्या ठिकाणी विराट सभा झाली होती त्याच ठिकाणी ही बैठक होणार आहे. रविवारी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत परिचय बैठक होणार आहे. तर दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत मुख्य बैठक असणार आहे. यामध्ये राज्यभरातील मराठा समाजासह स्वयंसेवक, आयोजक, साखळी उपोषणकर्ते, डॉक्टर, वकील, अभ्यासक, साहित्यिक, इतिहास अभ्यासक सहभागी होणार आहेत. मराठा समाजाला २४ तारखेपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर पुढचे आंदोलन शांततेत असले तरी मोठे आंदोलन करण्यात येईल. यासंदर्भात येत्या रविवारी आंदोलनाची पुढील रणनिती ठरविली जाईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मी माझा निर्णय समाजावर लादत नाही. कारण मी समाजापेक्षा मोठा नाही. मी मराठा सेवक आहे. सोशल मीडियावर जे व्हिडिओ, संदेश व्हायरल होत असतील ते समाजाची भावना, खदखद असू शकते असे ते म्हणाले. समाजाच्या हिताचा विषय असल्याने सर्वांनी उपस्थित राहावं, आमंत्रण सगळ्या समाजाला आहे, आमंत्रणाची वाट पाहात बसू नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

पोलिस अधीक्षकांनी साधला संवाद
मराठा समाजाची रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वडीगोद्री येथील ओबीसी साखळी उपोषणास भेट देवून संवाद साधला. शिवाय मराठा आंदोलकांशीही संवाद साधला. कोणीही कायदा हातात घेवू नये, सामाजिक भावना दुखावतील अशा घोषणा देवू नयेत, असे आवाहन केले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे,सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत आदी होते.

Web Title: The next direction of the Maratha reservation movement will be tomorrow; Manoj Jarange will announce the role after the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.