पोलिसांची दमदार कामगिरी; तब्बल १७ तास पाळत ठेवून पकडले चोरटे; २४ गुन्ह्यांची झाली उकल
By दिपक ढोले | Published: August 5, 2022 06:32 PM2022-08-05T18:32:10+5:302022-08-05T18:33:45+5:30
विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले जनावरे चोरीचे जवळपास २४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
जालना : सिल्लोडहून कारमधून जालन्यात यायचे. नंतर विविध ठिकाणी रस्त्यावर उभा असलेली जनावरे चोरून घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी पाठलाग करून पकडले. जुनेद ताहेर कुरेशी (२४५ रा. स्नेहनगर ता.सिल्लोड), शेख मेहबुब सुबराती (४८ रा. इदगाहनगर सिल्लोड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १२ लाख रूपये किंमतीच्या दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून जवळपास २४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
बुधवारी रात्री एलसीबीचे पथक जालना शहरात विविध ठिकाणी चोरट्यांचा शोध घेत होते. पथकाला एक कार जातांना दिसली. तिला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, ती थांबली नाही. पथकाने कार चालकाचा पाठलाग केला. परंतु, कार मिळून आली नाही. पथक सिल्लोड येथे पोहोचले. सिल्लोड येथे सदरील कार दिसून आली. कारमध्ये कोणीच नव्हते. कारवर लक्ष ठेवले. दुपारी दोन वाजेपर्यंत कोणीच आले नाही.
त्यानंतर पथकाने तब्बल १७ तास पाळत ठेवली. रात्री दहा वाजेच्या सुमारास एक इसम कार घेऊन जाण्यासाठी आला. त्याचवेळी पथकाने त्याला ताब्यात घेतले. जुनेद ताहेर कुरेशी असे नाव सांगितले. त्याला विचारपूस केली असता, त्याने साथीदारांसह जनावरे चोरी केल्याची कबुली दिली. सदरील जनावरे ही मेहबुब सुबराती याला विक्री केल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्याने जालना शहरातून बहुतांश जनावरे चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यात कुऱ्हाड, सुरी, रॉड जप्त करण्यात आली. शिवाय दोन कारही जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले जनावरे चोरीचे जवळपास २४ गुन्हे उघडकीस आले आहेत.