वीज कडाडली अन् चालकाचे नियंत्रण सुटलं; जालना- अंबड रोडवर भरधाव बस उलटली
By महेश गायकवाड | Published: March 16, 2023 12:36 PM2023-03-16T12:36:38+5:302023-03-16T12:37:26+5:30
या अपघातात एसटीच्या वाहक-चालकासाहित दहापेक्षा जास्त प्रवासी गंभीत जखमी झाले.
जालना: अंबड - जालना महामार्गावर गुरुवारी सकाळी अकरा वाजता भरधाव वेगाने अंबडकडे जाणारी एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या अपघातात एसटीच्या वाहक-चालकासाहित दहापेक्षा जास्त प्रवासी गंभीत जखमी झाले. गोलापांगरी जवळ हा अपघात झाला. वळण रस्त्यावर बसला एका ट्रकपासून वाचविताना अचानक वीज कडाडल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
जालना आगारातून प्रवासी घेऊन अंबडकडे निघालेली बस क्रमांक.एम. एच. २० ,बी. एल. २२९९ ही गोलापांगरी जवळील टोलनाक्या जवळील वळण रस्त्यावरून जात असताना अंबडकडून येणाऱ्या एका ट्रकने बसला हुलकावणी दिली. यावेळी बस नियंत्रित करताना अचानक वीज कडाडली त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. यात दहापेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाव परिसरातील नागरिकांनी प्रवाशी व वाहक-चालकांना बाहेर काढून दवाखान्यात हलवले. यासाठी युवकांची मोठी मदत मिळाली.