पाऊस लांबला, पेरणी खोळंबली; आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने संपवलं जीवन
By विजय मुंडे | Published: June 23, 2023 06:49 PM2023-06-23T18:49:31+5:302023-06-23T18:50:30+5:30
वेळेवर पेरणी झाली नाही तर उत्पन्न हाती पडणार नाही आणि उत्पन्न मिळाले नाही तर डोक्यावरील कर्जाचा डोंगर फिटणार कसा?
हसनाबाद (जि. जालना) : पैशांची जुळवाजुळव करून शेतीची मशागत केली. बी-बियाण्यांसह खतांचीही खरेदी केली. परंतु, पावसाने मोठी ओढ दिल्याने खरिपाची पेरणी रखडली. वेळेवर पेरणी झाली नाही तर उत्पन्न हाती पडणार नाही आणि उत्पन्न मिळाले नाही तर डोक्यावरील कर्जाचा डोंगर फिटणार कसा, या विवंचनेतून एका ४० वर्षीय शेतकऱ्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी पिंपळगाव कोलते (ता. भोकरदन) शिवारात घडली.
रमेश त्रिंबक सोनवणे (४०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते येथील रमेश त्रिंबक सोनवणे यांना गावच्या शिवारात चार एकर शेत आहे. रमेश सोनवणे हे गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर गेले होते. ते रात्री घरी न आल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. शेतातील विहिरीत शुक्रवारी सकाळी रमेश सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
सोनवणे यांनी उसनवारी करून खरिपासाठी शेतीची मशागत केली. खते, बी-बियाण्यांची खरेदी केली. परंतु, जून महिना शेवटच्या टप्प्यात आला तरी पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे वेळेत पेरणी झाली नाही तर उत्पन्न हाती पडणार नाही आणि डोक्यावरील सोसायटीसह खासगी कर्ज फिटणार नाही, याची चिंता त्यांना होती. याच चिंतेतून सोनवणे यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.