चोरीच्या दुचाकी फायनान्सच्या असल्याचे सांगून विक्री करणारा अटकेत
By दिपक ढोले | Published: May 7, 2023 06:27 PM2023-05-07T18:27:25+5:302023-05-07T18:27:54+5:30
जालना शहरासह छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकींची चोरी करून त्या फायनान्सच्या असल्याचे सांगून विकणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी गजाआड केले आहे.
जालना: जालना शहरासह छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकींची चोरी करून त्या फायनान्सच्या असल्याचे सांगून विकणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख ६५ हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दुचाकींची चोरी करणाऱ्यांचा शोध घेत असताना, जुना जालन्यातील दु:खीनगर भागात राहणाऱ्या संशयित अफरोज शेख बाबूलाल (२१) याच्याकडे चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित अफरोज शेख यास दु:खीनगर भागातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार संशयित अतिक अहेमद ईसाकखान पटेल (रा. मदिना चौक, जालना) याच्या मदतीने राजूर व छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकींची चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकी जप्त केल्या. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, अतिक पटेल याच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर येथून आणखी पाच दुचाकींची चोरी करून त्या फायनान्सच्या असल्याचे सांगून कागदपत्रे नंतर देण्याच्या अटीवर विक्री केल्याची कबुली दिली. पोलिसांनी विक्री केलेल्या या दुचाकी शहागड व माजलगाव (जि. बीड) येथे जाऊन जप्त केल्या आहेत. दरम्यान, संशयित अतिक पटेल याचा शोध घेतला असता, तो मिळून आला नाही.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, कर्मचारी आर. वाय. जैवाळ, कृष्णा तंगे, परमेश्वर धुमाळ, सचिन चौधरी, जगदीश बावणे, फुलचंद गव्हाणे, प्रशांत लोखंडे, देेविदास भोजने, भागवत खरात, किशोर पुुंगळे, रवी जाधव, कैलास चेके यांनी केली.