स्टीलच्या दरातील तेजी हळूहळू उतरली, मागणीअभावी दर पुन्हा गडगडले
By संजय देशमुख | Published: November 18, 2022 01:41 PM2022-11-18T13:41:21+5:302022-11-18T13:41:55+5:30
विजेची सबसिडी लांबणीवर : कर वगळता ४८ हजारांवर आले भाव
- संजय देशमुख
जालना : तीन ते चार महिन्यांपूर्वी स्टीलच्या दरात आलेली तेजी हळूहळू उतरली असून, आजघडीला कर वगळता स्टीलचे दर ४८ हजारांवर आले आहेत. म्हणजेच २४ हजार रुपयांची विक्रमी घसरण झाल्याचे चित्र आहे. हे दर घसरण्यामागे घटलेली मागणी, राज्य सरकारकडून विजेची न मिळालेली सबसिडी, फ्युअल टॅक्स आणि इम्पोर्ट ड्युटी ही कारणे सांगितली जात आहेत.
विदर्भाप्रमाणेच जालन्यातील स्टील उद्योग संकटात सापडला आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने मोठ्या शहरांमध्ये बांधकाम व्यवसाय झेप घेईल अशी चिन्हे होती; परंतु तसे झाले नाही. दसरा, दिवाळी झाल्यावर बांधकाम रिअल इस्टेटमध्ये तेजीचे संकेतही होते. परंतु, जी तयार घरे आहेत, त्यांनाच मागणी असल्याचे दिसते. नवीन मोठ्या प्रोजेक्टवर ज्या पद्धतीने गती घेणे अपेक्षित होते, ती गती घेतली नाही. याचा परिणाम घरबांधणीसाठी लागणाऱ्या स्टील अर्थात लोखंडी सळ्यांच्या उत्पादनावर झाला आहे. मोठी गुंतवणूक करून येथील स्टील उद्योजकांनी मागणीपूर्व काही टनांमध्ये उत्पादन करून त्याची साठवणूक केली होती. आज ना उद्या स्टीलला चांगले दिवस येतील असे वाटले होते; परंतु उद्योजकांच्या या आशेवर मागणीअभावी पाणी फेरले आहे.
या उद्योगाला चालना देण्यासाठी मध्यंतरी विदर्भ तसेच मराठवाड्यातील उद्योगांना विजेच्या दरात सबसिडी दिली होती. परंतु, ही सबसिडी अद्याप मिळाली नाही. त्यातच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन नवीन सरकार आले. या सरकारकडूनही पाहिजे ती दखल घेतली गेलेली नाही. विजेचे दर महाराष्ट्रात खूप अधिक आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्राचे शेजारी असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये हे दर चार ते पाच रुपयांनी प्रतियुनिट कमी आहेत. असेच दर जर महाराष्ट्रात मिळाले तर उत्पादनावरील खर्च कमी होऊन उद्योजकांना दिलासा मिळू शकतो. परंतु, वारंवार मागणी करूनही सरकार त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचे वास्तव आहे.
अनेकांनी घटवले उत्पादन
स्टीलची घटलेली मागणी आणि घसरलेले विक्रमी दर यामुळे उद्योजक नियमितपणे जे उत्पादन घेत होते ते त्यांनी सरासरी २० ते २५ टक्के घटविले आहे. केलेल्या उत्पादनाचा साठा ठेवावा कुठे, हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कमी झालेल्या दरातही आणखी काही डिस्काउंट करून मुद्दल काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व करांसहित तीन महिन्यांपूर्वी स्टीलचे दर हे थेट ९० हजार रुपये प्रतिटनावर पोहोचले होते. आज कर न आकारता मूळ दर हे थेट ७२ हजार रुपयांवरून चक्क ४८ हजार रुपये टनावर आल्याचे योगेश मानधनी (अध्यक्ष स्टील मॅन्युफॅक्चर असो. महाराष्ट्र) यांनी सांगितले.