स्त्रीशक्तीची ताकद, २११ गावखेड्यांना उन्नतीच्या मार्गावर नेतायत २०८५ बचत गटातील महिला !
By विजय मुंडे | Published: July 25, 2023 04:00 PM2023-07-25T16:00:59+5:302023-07-25T16:02:21+5:30
कुटुंबाची आर्थिक प्रगती साधली; समूह उद्योग, वैयक्तिक उद्योगातून वाढली आर्थिक उलाढाल
जालना : जिल्ह्यातील १०-२० नव्हे तब्बल २११ गावखेड्यातील २०८५ बचत गटाअंतर्गत महिलांनी वैयक्तिक, समूहस्तरावरील उद्योग सुरू केले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत (माविम) विविध शासकीय योजनांचा लाभ, बँकांचे कर्ज घेऊन या महिलांनी उद्योग, व्यवसाय सुरू केले असून, स्थानिक बाजारपेठेत या मालाला मागणीही वाढली आहे. महिलांच्या पुढाकारातून त्यांच्या कुटुंबाची प्रगती होत असून, गावांतील व्यवहारालाही चालना मिळाली आहे.
महिला, मुलींच्या उन्नतीसाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या अनुषंगाने महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे विणण्यात आले आहे. या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे, उद्योग सुरू करणे, उद्योगासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम माविम अंतर्गत केले जाते. माविमअंतर्गत जिल्ह्यातील २२१ गावांत २०८५ महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटांमध्ये प्रत्येकी १० ते १२ महिलांचा समावेश असून, एकूण २४ हजार २८ महिला या बचत गटाशी जोडल्या गेल्या आहेत. या गटांतर्गत मासिक बचत करणेच नव्हे तर स्वत:चे उद्योग, सामूहिक उद्योग सुरू करण्याचे कामही माविमअंतर्गत करण्यात आले आहे. या गटांमुळे संबंधित महिलांची त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे तर गावाची प्रगती होण्यासही हातभार लागल्याचे दिसून येत आहे.
सामूहिक स्तरावरील उद्योग
माविमअंतर्गत बँकामार्फत सामूहिक उद्योग सुरू करण्यासाठी एक लाख ते १७ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले आहे. महिलांनी समूह शेती, भाडेतत्त्वावर शेती, धान्य खरेदी- विक्री, निंबोळी अर्क, भाजीपाला खरेदी विक्री, कापडी पिशव्या शिवणे, फिनाईल हँडवाॅश, एलईडी बल्ब, दाळमिल, मिरची पावडर, हळद पावडर, विविध मसाले, पापड तयार करणे, हॅण्डीक्रॉप वस्तू, दूध संकलन आणि प्रक्रिया आदी उद्योग सुरू केले आहेत.
वैयक्तिक उद्योग
महिलांना वैयक्तिक उद्योग सुरू करण्यासाठी बँकांकडून एक लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्यात शिवणकाम, ब्यूटीपार्लर, भोजनालय, स्टेशनरी, कटलरी, किराणा दुकान आदी विविध उद्योग महिलांनी सुरू केले आहेत.
स्थानिक ते जिल्ह्याची बाजारपेठ काबीज
सामूहिक, वैयक्तिक उद्योगातून उत्पादित होणारा माल हा स्थानिक बाजारपेठ ते जिल्हास्तरावरील बाजारपेठेत विक्री केला जात आहे. विशेषत: विभागीय, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनातही बचत गटाचे उत्पादन मांडून त्याला बाजारपेठ मिळवून दिली जात आहे.
आर्थिक उन्नती झाली
महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचतगटातील महिलांना उद्योग, व्यवसायासाठी प्रेरित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २२१ गावांत महिला बचतगट सुरू झाले असून, अनेक महिलांचे व्यवसाय सुरू झाले असून, महिलांची आर्थिक उन्नती झाली आहे.
-उमेश काहाते, जिल्हा समन्वय अधिकारी
विकासात महिलांचा वाटा
आमच्या विभागातील अनेक महिलांनी सामूहिक, वैयक्तिक व्यवसाय सुरू केले आहेत. उत्पादित मालाला शहरी, ग्रामीण भागात माेठी मागणी आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक उन्नती होत असून, गाव-शहरांच्या विकासात महिलाही वाटा उचलत आहेत.
-मीनाक्षी घायाळ, सीएमआरसी व्यवस्थापक