शिक्षकाने विद्यार्थिनीस पळवून नेले; सोनामाता हायस्कूलला पालकांनी ठोकले टाळे
By विजय मुंडे | Published: June 14, 2023 07:49 PM2023-06-14T19:49:54+5:302023-06-14T19:50:41+5:30
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह इतर असुविधांबाबतही प्रश्नांचा भडिमार
बदनापूर : तालुक्यातील ढासला येथील सोनामाता हायस्कूलमधील शिक्षकाने एका मुलीला पळवून नेल्या प्रकरणात करमाड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. हा प्रकार समजल्याने संतप्त पालकांनी त्या शिक्षकावर कारवाई करावी, यासह हायस्कूलमध्ये सीसीटीव्ही नसणे, शौचालयाचा अभाव, पिण्याचे पाणी आदी प्रश्नांचे जाब विचारत बुधवारी शाळेला टाळे ठोकले. संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यासह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत कुलूप काढणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतली आहे.
बदनापूर तालुक्यातील ढासला येथे सोनामाता हायस्कूलमध्ये मराठी माध्यमाचे पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत सागरवाडी, मालेवाडी, पीरवाडी, ढासला, कासनापूर येथील मुले-मुली शिक्षण घेतात. परंतु, या शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनी पळवून नेल्याची तक्रार पीडित मुलीच्या पालकांनी करमाड पोलिस ठाण्यात दिली आहे. ही बाब समजताच संतप्त झालेल्या पालकांनी बुधवारी सकाळीच सोनामाता हायस्कूल गाठून प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाला निलंबित करावे, शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शौचालयाची सुविधा उपलब्ध करावी, पिण्याचे पाणी द्यावे, शिक्षकांना शाळेत वेळेत येण्याच्या सूचना द्याव्यात आदी विविध मागण्या पालकांनी लावून धरल्या.
यावेळी मुख्याध्यापक बुचकूल यांनी पालकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. परंतु, पालकांनी शिक्षकांना निलंबित करण्यासह इतर सुविधा उपलब्ध होईपर्यंत टाळे न काढण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, संबंधित शिक्षकावर हायस्कूल स्तरावरून योग्य ती कारवाई केली जाणार असून, गरजेनुसार सोयीसुविधा मुला-मुलींना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे मुख्याध्यापक बुचकूल यांनी सांगितले.
अटक होईपर्यंत कुलूप राहणार
शिक्षकाने मुलगी पळवून नेल्याचा आरोप झाला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यामुळे त्या शिक्षकावर कारवाई करून अटक हाेईपर्यंत शाळेचे कुलूप उघडले जाणार नाही.
- राम पाटील, सरपंच, ढासला