महिलांनी हंडा मोर्चातून भोकरदन नगरपालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By शिवाजी कदम | Published: December 18, 2023 07:19 PM2023-12-18T19:19:28+5:302023-12-18T19:19:52+5:30
भोकरदन शहरावर पाणी टंचाईचे संकट, चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी
भोकरदन: अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये पाणी टंचाईचे संकट गहरे झाले आहे. भोकरदन शहरात तीव्र पाणी टंचाई सुरू असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चार दिवस आड शहरात पाणीपुरवठा करा या मुख्य मागणीसाठी कॉंग्रेस कमिटीकडून नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. हंडा मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
मोर्चाच्याची सुरूवात नवे भोकरदन येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर आण्णाभाऊ साठे, टिपु सुलतान, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा नगरपालिका कार्यालयासमोर पोहचला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी एजाज पठाण, राहुल देशमुख, वंदना हजारे, बंटी औटी, त्रिंबकराव पाबळे यांची मार्गदर्शन केले. यानंतर नगरपालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले.
खडकपूर्णा योजनेतून आलेले पाणी तात्काळ शहराला पुरविणे, शहरातील हातपंप दुरूस्ती, नवीन कूपनलिका, घरकुल लाभार्थ्यांची देयके, शहरातील स्वच्छता या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनावर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, तालुकाध्यक्ष त्रिबंकराव पाबळे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, भाऊसाहेब सोळुंके, श्रावण आक्से, चंद्रकांत पगारे, एजाज पठाण, संतोष अन्नदाते, रिझवान शेख, महेश दसपुते, गणेश आक्से, साळुबा लोखंडे, रफिक पानवाले, दादाराव देशमुख, सोपान सपकाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मोर्चा यशस्वीतेसाठी अनिता गायकवाड, लक्ष्मीबाई लाहुरीकर, संगीता सुरडकर, सुनिता शिंगारे, संगीता फुसे, ललिता पारख, निर्मला आक्से, अंजना बारोकर, पंजाब देशमुख, वंदना हजारे, महेश औटी, रोषण देशमुख यांनी प्रयत्न केले.
शहरात कृत्रिम पाणी टंचाई
महिनाभरापासून खडकपूर्णा धरणातून पाणी आलेले आहे. केवळ सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे व प्रशासकाच्या दुर्लक्षाने भोकरदन शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. येत्या पंधरा दिवसांत शहराला चार दिवसा-आड पाणी पुरवठा केला नाही, तर आम्ही धरणे आंदोलने करु. या परिस्थितीला नगरपालिकेचे प्रशासक जबाबदार राहतील.
- राजाभाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष,कॉंग्रेस.