तरुण शेतकऱ्याने करून दाखवले; अवघ्या पंचवीस गुंठ्यांत फूलशेतीतून लाखोंचे उत्पन्न
By शिवाजी कदम | Published: January 2, 2024 07:11 PM2024-01-02T19:11:29+5:302024-01-02T19:12:10+5:30
कमी शेतीमध्ये देखील भरघोस उत्पन्न घेऊन फायद्याची शेती
- पवन पवार
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील सौंदलगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने अवघ्या २५ गुंठ्यांत अडीच लाखांचे उत्पन्न घेण्याची किमया केली आहे. अजय राऊत या कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणाने कमी शेतीतदेखील जास्त उत्पन्न घेता येते हे शक्य करून दाखविले आहे.
शेती हा तोट्यात चालणारा व्यवसाय असल्याचे सांगण्यात येते. परंतु, सौंदलगाव येथील अजय राऊत यांनी कमी शेतीमध्ये देखील भरघोस उत्पन्न घेऊन फायद्याची शेती कशी करावी याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अजय राऊत यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:ची शेती फुलवण्याचा निर्णय घेतला.
सहा हजार रोपांची लागवड
अजय राऊत यांना दोन एकर शेती आहे. दोन भाऊ, आई, भावजय हे शेतात राहतात. यावरच त्यांच्या संसाराचा गाडा चालतो. या दोन एकर शेतात पारंपरिक पद्धतीने उत्पन्न मिळत नसल्याने अजय राऊत यांनी दोन एकरांमधील २५ गुंठे शेतीत शेवंतीचे सेंट व्हाईट व पौर्णिमा व्हाईट या फुलांची सहा हजार रोपे लावली. त्यांना रोपांसाठी १२ हजारांचा खर्च आला. जुलैमध्ये लावलेल्या रोपांना नोव्हेंबरमध्ये फुले आली.
पाच टन फुलांचे उत्पन्न
अजय राऊत यांनी रोज एक क्विंटल शेवंतीचे फुले तोडून ती ४० रुपये किलो प्रमाणे जालना व छत्रपती संभाजीनगर शहरात पाठवली. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. दोन महिन्यांत पाच टन फुलांचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. फुले विक्रीतून त्यांना अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ५० हजार रुपये खर्च वजा करता दोन लाखांचा निवळ नफा फूलशेतीतून अजय राऊत यांना मिळाला आहे.
स्वत:ची शेती समृद्ध करा
दुष्काळ, अवकाळी पाऊस, त्यात पारंपरिक शेती यामुळे यातून कमी उत्पन्न मिळत असल्याने मोठ्या कठीण परिस्थितीत संसाराचा गाडा हाकावा लागत होता. कमी खर्च व कमी क्षेत्रात फूलशेती करण्याचा निर्णय घेतला. फूलशेतीचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता दैनंदिन उत्पन्न होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या स्वत:च्या शेतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास चांगले उत्पन्न मिळविणे शक्य आहे.
- अजय राऊत, फूल उत्पादक, सौंदलगाव.