बेताची परिस्थिती पाहून तरुणाने शेतात काम सुरु केलं; पण गव्हाला पाणी देताना शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2023 04:08 PM2023-03-03T16:08:26+5:302023-03-03T16:08:55+5:30
पिकाला पाणी देत असताना विजेच्या तुटलेल्या वायरला अचानक धक्का लागला.
राजूर ( जालना) : गव्हाला पाणी देताना तुटलेल्या वायरचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथे गुरुवारी घडली. सतीश मधुकर टोम्पे (२१) असे मयताचे नाव आहे.
मधुकर टोम्पे यांना जेमतेम शेती आहे. त्यांना दोन मुले असून, एक मुलगा राजूर येथील एका खासगी बँकेत काम करतो. तर दुसरा सतीश हा पोलीस भरतीची तयारी करीत होता. परंतु, त्याला यश मिळत नव्हते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने वडिलांना तो शेतीकामात मदत करीत होता. गुरुवारी दुपारी शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी तो गेला होता. पिकाला पाणी देत असताना विजेच्या तुटलेल्या वायरला अचानक धक्का लागला. पिकात फेकल्या गेल्यामुळे बराच वेळ त्याच्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. एका महिलेने त्याला पाहताच, आरडाओरड सुरू केली. आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन सतीशला राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सतीशच्या जाण्याने टोम्पे कुटुंबीयावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलीस बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले
सतीश हा मनमिळावू स्वभावाचा होता. तो घरच्या परिस्थितीची जाण ठेवून वागत होता. त्याला लहानपणापासून पोलीस व्हायचे होते. त्यानुसार त्याने अभ्यासही केला. परंतु, त्यात त्याला यश मिळाले नाही. शेवटी तो वडिलांना शेतीकामात मदत करीत होता. परंतु, त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.