मंठा येथे चार दुकाने फोडली; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:00 AM2019-08-02T01:00:54+5:302019-08-02T01:01:39+5:30
गजबजलेल्या वस्तीमधील चार दुकाने फोडून चोरट्यांनी ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : शहरातील गजबजलेल्या वस्तीमधील चार दुकाने फोडून चोरट्यांनी ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या खेतेश्वर स्वीट मार्ट या दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील ७०० रुपये रोख रक्कम व मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तर स्वामी विवेकानंद शाळा रोडवर केशव भगवान बोराडे यांचे फोटो स्टुडिओचे दुकान आहे.
या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील ५५ हजार रुपये किंमतीचा कॅमेरा, १० हजार ५०० रोख रक्कम असा ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. तसेच संतोष अंकुश जाधव यांच्या पथॉलॉजीचे शटर तोडून ५०० रुपये तर संग्राम फिल्टरचे संचालक व्यंकटेश लिपणे यांच्या दुकानातून ३ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहे. यापकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोनि. विलास निकम यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम केला. पुढील तपास पोउपनि. आर. टी. चव्हाण करीत आहेत.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या खेतेश्वर स्वीट मार्ट दुकानातील मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून, पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, बुधवारी मंठा शहरातील अतिक्रमण काढण्यात आले.
त्यामुळे सर्व पोलीस कर्मचारी दिवसभर त्या कामात होते. त्यामुळे रात्री गस्तीवर कमी पोलीस कर्मचारी होते. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्यात आली असल्याची माहिती पोनि. विलास निकम यांनी दिली.