जांबसमर्थ येथील ऐतिहासिक मंदिरात चोरी; रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या सहा मूर्तीं लंपास
By विजय मुंडे | Published: August 22, 2022 11:29 AM2022-08-22T11:29:09+5:302022-08-22T11:30:14+5:30
श्रीराम, सीता माता, लक्ष्मणासह हनुमानाच्या दोन मूर्ती लंपास
कुंभार पिंपळगाव (जि.जालना) : श्री समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या श्रीराम, सीता माता, लक्ष्मण व हनुमानाच्या दोन पंचधातूच्या मूर्ती चोरट्यांनी लंपास केल्या. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास तीर्थक्षेत्र जांबसमर्थ (ता.घनसावंगी) येथे घडली आहे. ऐतिहासिक मंदिरातून पंचधातूच्या सहा मूर्तींची चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
तीर्थक्षेत्र जांबसमर्थ हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. येथील जांबसमर्थ मंदिर, श्रीराम मंदिरात इ.स. १५३५ मधील श्री राम, सितामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या. विशेषत: श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी व हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती. चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास या श्रीराम मंदिरातून श्रीराम, सितामाता, लक्ष्मण, हनुमानांच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी केली आहे. हा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. या घटनेबाबत तीव्र संतापही व्यक्त केला जात होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. विक्रांत शिंदे, डीवायएसपी सुनील पाटील, पोनि. प्रशांत महाजन, पोउपनि. संतोष मरळ आदींनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. शिवाय तपासासाठी पथकेही रवाना केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
चोरट्यांना महावितरणचे सहकार्य, ग्रामस्थांचा आरोप
चार हजार लोकसंख्येच्या तीर्थक्षेत्र जांबसमर्थ गावातील वीजपुरवठा सातत्याने गुल होत आहे. पहाटेच्या वेळीच अचानक वीजपुरवठा खंडित होत असून, महावितरणचा हा प्रकार म्हणजे चोरट्यांना सहकार्य करण्यासारखा असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मंदिरात सुरक्षा रक्षक नाही
जांब समर्थ मंदिराला तीर्थक्षेत्र ब दर्जा आहे. परंतु, या मंदिराच्या सुरक्षेसाठी अद्याप सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. त्यात पहाटे वीज जात असल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.