दोन अल्पवयीनांकडून चोरीचा सुका मेवा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:51 AM2019-03-03T00:51:45+5:302019-03-03T00:51:58+5:30
एका व्यापाऱ्याचा चोरी गेलेला ४६ हजार रुपयाचा सुकामेवा दोन अल्पवयीन बालकांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एका व्यापाऱ्याचा चोरी गेलेला ४६ हजार रुपयाचा सुकामेवा दोन अल्पवयीन बालकांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला. ही कारवाई विशेष कृती दलाच्या पथकाने शनिवारी केली.
२५ फेब्रुवारी रोजी अफरोज खान मोईन खान (रा. बैधपुरा) यांच्या फिर्यादीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरासमोर चारचाकी हातगाडी उभी करुन सर्व काजू, बदाम व इतर माल हातगाडीवरच प्लास्टिकच्या पन्नीद्वारे झाकून बांधून ठेवला होता. २२ फेबु्रवारी रोजी सकाळी गाडीतील काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, गोंद, किसमिस, गोडंबी असा एकूण ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, शनिवारी एडीएसचे प्रमुख यशवंत जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, बैधपुरा येथून चोरीस गेलेले काजू, बदाम चोरी ही अल्पवयीन बालकांनी केली असून, सदर दोन्ही मुले उडपी चौकात एका हॉटेलमध्ये बसलेली आहेत. यावरून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेला माल जप्त करण्यात आला.