"मग, मी तुमच्यापुढं कान धरले असते"; मनोज जरांगेंनी 'मराठा' नेत्यांनाही सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 11:01 AM2024-02-28T11:01:08+5:302024-02-28T11:58:17+5:30
सरकारकडून दडपशाही सुरू असून गृहमंत्र्यांनी आंतरवालीतील मंडप काढून फेका, व्यासपीठ काढा, असे आदेश दिल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
जालना - आंदोलन करायचं, पण शांततेत असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही, असे म्हटले. सगेसोयरेची अंमलबजावणी करा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर आपण ठाम आहोत. त्यासाठी, सध्या केवळ परीक्षा असल्याने ३ मार्चपर्यंतचं रास्तारोको आंदोलन रद्द केलं असून गावागावात साखळी उपोषण सुरू असल्याचं जरांगे यांनी म्हटलं. यावेळी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरुन मराठा नेते नाराज असल्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच, मराठा नेत्यांनाही चांगलंच सुनावलं.
''सरकारकडून दडपशाही सुरू असून गृहमंत्र्यांनी आंतरवालीतील मंडप काढून फेका, व्यासपीठ काढा, असे आदेश दिले आहेत. पण, आंतरवालीचा मंडप हा मराठ्यांच्या अस्मितेचा मंडप आहे, तो आंतरवालीचा मंडप नाही. त्यामुळे, मराठ्यांना घाबरण्याचं कारण नाही. त्याच मंडपाने मराठा समाज एक केलेला आहे, त्याच मंडपाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलेलं आहे.'', असे मनोज जरांगे यांनी म्हटलं. तसेच, सरकारला, विशेष करुन गृहमंत्र्यांना सांगणं आहे की, असले चाळे बंद करा. मंडपाजवळ खून पडले नाहीत, कापाकापी सुरू नाही की तिथं दहशतवाद्यांची लेकरं नाहीत. तिथं शांततेत साखळी उपोषण सुरू आहे, तुम्ही दडपशाही बंद करा,'' असे आवाहनही जरांगे यांनी सरकारला केले आहे. यावेळी, बोलताना मराठा नेत्यांनाही त्यांनी सुनावलं आहे.
आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सरकारकडून सुरू असलेली दडपशाही थांबवा, आणि सगेसोयरे याची अंमलबजावणी करा, अशा आशयाचे ईमेल सर्व मराठा बांधवांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. करोडेंच्या संख्येने हे इमेल करा, असे जरांगे यांनी म्हटले. मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही. मला अटक केली तरी माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे, तुरुंगातच उपोषण करणार आहे, असेही जरांगे यांनी म्हटले.
मी भांडलो कोणासाठी, तर मराठ्यांसाठी. त्यामध्ये, श्रीमंत मराठा असो, राजकारणी मराठा असो, नोकरदार वा व्यावसायिक असो, शेतकरी-कष्टकरी, गोरगरीब-लहानमोठ्या मराठ्यांसाठी मी भांडलो. मी बोललोय नेत्याला, पण राग आलाय मराठ्यांच्या नेत्याला, असे म्हणत मराठा समाजातील नेत्यांनाही जरागेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या नेत्याला का बोलला म्हणून मराठ्यांच्या नेत्याला राग आलाय. पण, तुला त्यानी जवळ का केलंय, तर गोरगरीब मराठ्यांनी तुला मतदान केलं, तू आमदार झाला, मंत्री झाला. म्हणून तुला त्यांनी जवळ केलंय. आज सगळ्या आमदारांची जबाबदारी आहे. तुम्ही जातीकडून बोलायला हवं होतं. तुम्ही तुमच्या नेत्याला विचारायला हवं की, अधिसूचना काढलीय ना, मग ती द्या. मग ते कसकाय येड्यावानी करतात ते बघू... असे म्हणत जरांगे यांनी मराठा नेत्यांनाच सुनावले. मग, मी देखील कानाला धरलं असतं, माझी चूक आहे म्हणून. ते गुन्हे मागे घेऊ म्हटले होते, ते मागे घ्या हे तुम्ही म्हणालया पाहिजे होतं. मग, मी तुमच्यापुढं कानं धरले असते. तुमच्या स्वार्थासाठी गोरगरीब मराठ्यांची पोरं मारायला निघालात का, असा सवालही जरांगे यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना केला आहे.
दरम्यान, मी मरायला तयार आहे, पण हटायला तयार नाही. सर्व मराठ्यांनी आपली एकजूट कायम ठेवावी, असे म्हणत शांतपणे पाहा काय होतंय ते. साखळी उपोषण आणि आंदोलन सुरू राहू द्या, असेही जरांगे यांनी म्हटले.