जालना जिल्ह्यात चार वर्षांत वाढल्या १०९ इंग्रजी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:57 AM2019-08-12T00:57:05+5:302019-08-12T00:57:32+5:30
गत चार वर्षांत जिल्ह्यात तब्बल १०९ इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्पर्धेच्या युगात इंग्रजीला आलेले महत्त्व आणि पालकांचा इंग्रजीशाळांकडे वाढलेला कल यामुळे गत चार वर्षांत जिल्ह्यात तब्बल १०९ इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. वारेमाप फीस आकारणाऱ्या काही इंग्रजी शाळांमधील गुणवत्तेचा प्रश्न मात्र, कायम आहे. विशेषत: अपवाद वगळता झालेल्या तक्रारींमुळे अनेक शाळा चौकशीच्या फे-यात अडकल्या आहेत.
वाढत्या स्पर्धेमुळे सुरू झालेल्या इंग्रजी शाळांमुळे शिक्षणाचे बाजारीकरण झाले आणि वारेमाप फीस आकारली जाऊ लागली. अनेकांनी व्यवसाय म्हणून इंग्रजी शाळा सुरू केल्याचे चित्र आहे. जालना जिल्ह्यात २६७ इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. मागील चार वर्षात तब्बल १०९ शाळांची भर पडली आहे. २०१५-१६ साली जिल्ह्यात १५८ इग्रंजी शाळा होत्या. २०१६-१७ मध्ये ही संख्या १७४ वर पोहचली. २०१७-१८ मध्ये १९७ शाळा सुरु झाल्या तर २०१८-१९ मध्ये हाच आकडा २६७ वर जाऊन पोहोचला. यंदाही शाळांचे अनेक प्रस्ताव प्रशासनाकडे आलेले आहेत.
इंग्रजी शाळा सुरू होत असल्या तरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी भरले जाणारे शिक्षक, त्यांचे शिक्षण याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेकांकडून नियम धाब्यावर बसविले जात असल्याच्याही तक्रारी असून, याकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या शाळांमुळे शिक्षणाचे बाजारीकरण झाले असले तरी संस्था चालकांनी किमान गुणवत्तेकडे लक्ष देऊन भावी पिढी घडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
इंग्रजी शाळा नियमांचे पालन करत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे धडकल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा तपासण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
जाफराबाद, भोकरदन, परतूर, मंठा, अंबड या तालुक्यातील शाळेंचा अहवाल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे. तर जालना, बदनापूर या तालुक्यातील शाळांचा अहवाल शिक्षण विभागाकडे येणे बाकी असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.