कोई नही आनेवाला बचाने को,हम पचास लोग है; कान, नाक कापून दागिने काढणारे दरोडेखोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 06:03 PM2022-03-31T18:03:43+5:302022-03-31T18:04:08+5:30
दोन दिवसांपूर्वी तीर्थपुरी येथे नागरिकांना मारहाण करून दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केला होता.
- दीपक ढोले
जालना : कोई नही आनेवाला आपको बचाने को.... हम ५० लोग है, असे म्हणत दरोडेखोर नागरिकांना धमकवायचे. त्यानंतर क्रूरतेने काना, नाकावर चाकूने वार करून दागिने काढायचे. राॅड टाकून हातातील दागिने काढणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना एलसीबीच्या पथकाने बुधवारी ताब्यात घेतले. गंगाराम व्यंकटी शिंदे (रा. पिठोरी सिरसगाव) व बाबुशा सावळा पवार (रा. गोंदी तांडा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. अन्य चार जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी तीर्थपुरी येथे नागरिकांना मारहाण करून दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना हा गुन्हा पिठोरी सिरसगाव येथील गंगाराम शिंदे, बाबुशा पवार यांनी साथीदारांसह केल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. घनसावंगी तालुक्यातील पिठोरी सिरसगाव व परिसरातील सहा दरोडेखोरांची ही टोळी आहे. त्यांच्यावर जिल्ह्यासह राज्यभरात दरोड्याचे ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. दरोडा टाकण्यासाठी ते संबंधित घराची पूर्ण माहिती काढून घेत असे. त्यानंतर वेगवेगळे बहाणे करून त्या घरी जाऊन पाहणी करायचे. नंतर मध्यरात्री दगड, कोयता, कुऱ्हाड, चाकू घेऊन दरोडा टाकायचे. घरात कोणी असल्यास त्यांना कोई नही आनेवाला बचाने को... हम ५० लोग है असे म्हणत धमकावयाचे.
कानावर, नाकावर चाकूने वार करून दागिने काढायचे. नंतर हातातील दागिनेही रॉडच्या साह्याने काढायचे. त्यांनी जाफराबाद व खडका येथेही अशाच प्रकारे दरोडा टाकला आहे. हिंदीतील वाक्यावरूनच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला क्लू मिळाला, त्यावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि. सुभाष भुजंग, पोउपनि. प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, संजय मगरे, जगदीश बावणे, रंजित वैराळ, रूस्तुम जैवाळ, विनोद गडदे, सचिन चौधरी, सागर बावीस्कर, दत्तात्रय वाघुंडे, कृष्णा तंगे, सुधीर वाघमारे, देवीदास भोजने, भागवत खरात, किशोर पुंगळे, कैलास चेके, योगेश सहाने, शडमल्लू , रमेश पैठणे आदींनी केली आहे.