चूक उमगलेले परतीच्या मार्गावर, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाही: जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 07:54 PM2024-07-26T19:54:57+5:302024-07-26T19:55:45+5:30
आता चूक उमगलेले कार्यकर्ते परत राष्ट्रवादीत येत आहेत.
जालना : राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतरही राज्यातील जनतेने शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येणे शक्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. पाटील यांनी गुरुवारी जालन्यातील मेळाव्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ता संवाद मेळावे घेतले जात आहेत. त्यापुढे आम्ही शिवसंवाद यात्रा दोन काढून जनतेशी संवाद साधणार आहोत. आता चूक उमगलेले कार्यकर्ते परत राष्ट्रवादीत येत आहेत. भाजपचे नेते, कार्यकर्ते येत आहेत. दोन वेगळे पक्ष झाले. जनतेने शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. आजही नैतिकतेला महत्त्व देणारी लोक आहेत. त्यामुळे असे लोक असेपर्यंत चिंता नाही, असेही पाटील म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढविणार असून, आमच्यात चर्चा झाल्याशिवाय राष्ट्रवादीला किती जागा मिळतील हे आज सांगता येणार नाही. परंतु, महाविकास आघाडीच्या १७५ हून अधिक जागा येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दोन्ही आंदोलकांना सरकारनेच आश्वासन दिले
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दल माहिती नाही. मराठा आरक्षणावर आम्ही आमची भूमिका पूर्वीच मांडली आहे. विरोधकांना विकास कामांवेळी विश्वासात घेतलं जात नाही. निधी वाटपावेळी विश्वासात घेतलं जात नाही. त्यात आता मराठा आंदोलक, ओबीसी आंदोलकांशी शासनाने चर्चा करून आश्वासन दिलं आहे. समाजाशी चर्चा करताना, आश्वासन देण्यापूर्वी विरोधकांना विश्वासात घेणे अपेक्षित होतं. सरकारने जे आश्वासन दिले त्यावर निर्णय घेण्याची वेळ आली असून, तो निर्णय वेळेत घ्यावा, असे पाटील म्हणाले.
मोठ्या नेत्यांनी आव्हान; प्रतिआव्हानांपासून दूर रहावे
एखाद्यावर आरोप केल्यानंतर त्याला त्यातून सोडविण्याचे आश्वासन देणे हे अतिशय गंभीर आहे. त्यात आता अनिल देशमुख यांच्यावर कोणत्या तरी अधिकाऱ्याला बोलून आरोप करायला लावले जात आहेत. या जुन्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा, विरोधी पक्षाची माप काढण्यापेक्षा आम्ही विकास कसा करणार, पुढे काय करणार हे सरकारने जनतेला सांगावे. राजकारणात आव्हान आणि प्रति आव्हानांपासून मोठ्या नेत्यांनी दूर रहावे, असा सल्ला पाटील यांनी फडणवीस यांना दिला.