शेती समृध्दतेत पशुधनाशिवाय पर्याय नाही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 01:11 AM2019-09-12T01:11:36+5:302019-09-12T01:12:10+5:30
शेती समृध्दीमध्ये पशुधनाला मोठे स्थान असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतकऱ्यांसाठी पशुधन हा महत्त्वाचा घटक असून, शेती समृध्दीमध्ये पशुधनाला मोठे स्थान असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मथुरा येथे राष्ट्रीय पशुधन नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचा बुधवारी शुभारंभ झाला. हा कार्यक्रम तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात ‘लाईव्ह’ दाखविण्यात आला. यावेळी खोतकर बोलत होते.
मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त, कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रीय सल्लागार डॉ. नितीन वाघ, सहायक पशुधन उपायुक्त डॉ. अमितकुमार दुबे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, पंडितराव भुतेकर, संतोष मोहिते, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्रीकृष्ण सोनुने, प्रा. विशाल यांची प्रमुख उपस्थिती होती
खोतकर म्हणाले, येत्या काळात एक हजार शेतकऱ्यांना दोन गायी, दोन म्हशी तसेच २० शेळ्या देण्याचा मानस आहे. शेतक-यांनी पशुधन वाढवत जावे आणि यातून आपली आर्थिक उन्नती साधावी. पोकरा ही शेतक-यांसाठी नवसंजीवनी आहे. येत्या काळात जनावरासाठी अॅम्बुलन्स सुद्धा उपलब्ध होणार आहे.
श्रीकृष्ण सोनुने यांनी प्रास्ताविक केले. शेतक-यांच्या दृष्टीकोनातून आज होत असलेला कार्यक्रम भारतातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. दिवसेंदिवस पशुधन कमी होत आहे. ते वाढविणे गरजेचे असून, लसीकरणाचे महत्त्व कार्यक्रमातून लक्षात येणार आहे
डॉ. जगदीश बुक्तारे यांनी जनावरांना होणा-या लाळ्या, खुरकुत या रोगाची लक्षणे सांगून लसीकरणाचे महत्त्व विशद केले. तर डॉ. नितीन वाघ यांनी ब्रूसेकोसी मुळे जनावरांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शेतक-यांची मोठी आर्थिक हानी होते. यासाठी चार ते आठ वेळा लसीकरण करावे, असे आवाहन केले. डॉ. अमितकुमार दुबे यांनी कृत्रिम रेतनाविषयी सविस्तर माहिती दिली. कृषी उपसंचालक विजय माईनकर यांनी कृषी विभागाच्या असलेल्या विविध योजना शेतक-यांना सांगितल्या. सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ डॉक्टर हनुमंत आगे यांनी केले.
कृषिरत्न विजयअण्णा बोराडे म्हणाले, शेतक-यांनी जनावरांची विशेष काळजी घेतली पाहिजे. सदैव जनावरे सुदृढ ठेवायची असतील तर लसीकरण महत्त्वाचे आहे.
जमेल त्या जनावराचा शेतक-यांनी वापर केलाच पाहिजे. जनावरांना होणा-या विविध रोगांविषयी जागरुक असले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.