कोर्टात उडाला गोंधळ; फिर्यादीने भर कोर्टात न्यायाधीशांसमोर कीटकनाशक केले प्राशन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 06:58 PM2023-05-09T18:58:31+5:302023-05-09T18:58:48+5:30
प्रकरण मिटविण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप
- फकिरा देशमुख
भोकरदन ( जालना) : साक्ष देण्यासाठी आलेल्या फिर्यादीने न्यायाधीशासमोरच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी येथील न्यायालयात घडली. राजू माणिकराव मिसाळ फिर्यादीचे नाव असून त्याच्यावर जालना येथे उपचार सुरु आहेत.
या बाबतची माहिती अशी की, तालुक्यातील जानेफळ मिसाळ येथील राजू माणिकराव मिसाळ यांना त्यांच्याच भावकितील शहादेव मिसाळ व इतर चार जणांनी सन 2020 मध्ये बेदम मारहाण केली होती. त्यावेळी राजू मिसाळ यांच्या तक्रारीवरून पाच जणांच्या विरुध्द हसनाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. भोकरदन न्यायालयात सदर प्रकरण सुरू होते.
मात्र, काही दिवसांपूर्वी भावकीतील काही लोकांनी गावात बैठक घेऊन प्रकरण तडजोड करून आपसात मिटविण्याचे ठरवले. यानुसार राजू यांनी न्यायालयात साक्ष देऊन प्रकरण मिटविण्याचे सांगण्यात आले. यानुसार, आज राजू मिसाळ व इतर सर्व न्यायालयात आले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश रोहिणी पाटील यांच्यासमोर साक्ष देण्यासाठी राजू मिसाळ उभे राहिले. यावेळी मला मारणारे मोकळे फिरत आहेत, माझ्यावर प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आहे. खोटी साक्ष दयावी यासाठी दबाव येत असल्याने मला जिवंत राहण्याची इच्छा नाही, असे म्हणून जवळ राजू यांनी बॉटलकाढून कीटकनाशक प्राशन केले. उपस्थितांनी राजूकडून बॉटल खाली पाडली. यामुळे न्यायालयात एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, सपोनि बालाजी वैद्य, कर्मचारी के. बी. दाभाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राजू मिसाळ यास भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक उपचार करून त्यास अधिक उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.