चंदनझिरा येथे मोठा अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:22 AM2017-12-02T00:22:44+5:302017-12-02T00:22:57+5:30
येथील सुंदरनगर भागात घरगुती सिलिंडरला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. आगीचा भडका उडाल्याने कोणीही आग विझविण्याचे धाडस केले नाही. मात्र, चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पोलीस काँस्टेबल अशोक जंधाळे यांनी प्रसंगावधान राखत धाडस करून आग विझविली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनझिरा : येथील सुंदरनगर भागात घरगुती सिलिंडरला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. आगीचा भडका उडाल्याने कोणीही आग विझविण्याचे धाडस केले नाही. मात्र, चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पोलीस काँस्टेबल अशोक जंधाळे यांनी प्रसंगावधान राखत धाडस करून आग विझविली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
चंदनझिरा येथील सुंदरनगरमध्ये अशोक बोर्डे यांचे घर आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास स्वयंपाक घरातील सिलिंडरच्या रेग्युलेटरच्या बाजूला अचानक आग लागली. बघता बघता आग वाढतच गेली. बाजुलाच आणखी एक भरलेले सिलेंडर असल्याने व आग वाढत असल्याने आग विझविण्यास कोणीच पुढे येईना. या आगीमुळे बाजूच्या रूममध्ये काहीजण अडकून पडले. त्यांनाही आगीमुळे बाहेर येता येईना. स्वयंपाक घरातील साहित्यानेही पेट घेतला.
याविषयी चंदनझिरा पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. येथील पोलीस काँस्टेबल अशोक जंधाळे हे क्षणाचाही विलंब न करता ठाण्यातील अग्निशमन सिलेंडर घेवून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोकॉ. जंधाळे यांच्या प्रसंगावधाने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबद्दल पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांनी जंधाळे यांचे कौतुक केले.