'आता बॉम्ब टाकले तरी मागे हटणार नाही...'; मनोज जरांगे यांच्याशी थेट संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 07:59 AM2023-09-03T07:59:35+5:302023-09-03T08:36:16+5:30
मनोज जरांगे पाटील यांची ‘लोकमत’ने घेतलेली एक्स्क्ल्युझिव मुलाखत..
- राम शिनगारे
अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) : मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी गावात २८ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी उपोषणस्थळी केलेला गोळीबार व लाठीहल्ल्यामुळे आंदोलन चर्चेत आले आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची ‘लोकमत’ने घेतलेली एक्स्क्ल्युझिव मुलाखत..
प्रश्न : पोलिसांनी गोळीबार केलाय का?
उत्तर : ही बघा गोळी. (जवळील रिकामी बुलेट दाखवतात). आमच्याकडे काही बुलेटचा कारखाना नाही ?
प्रश्न : आंदोलन किती दिवस चालणार?
उत्तर : आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही. काल त्यांनी गोळीबार केला. आता बॉम्ब टाकले तरी मागे हटणार नाही.
प्रश्न प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन कशासाठी?
उत्तर : आम्ही न्यायप्रविष्ट आरक्षणाचा विषय घेतलेलाच नाही. मराठवाड्यातल्या मराठ्यांना पूर्वी आरक्षण होतं, ते आरक्षण द्या, असं आम्ही म्हणतोय. जर हे न्यायप्रविष्ट असतं तर मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी समिती कशाला गठित केली? विदर्भाच्या अगोदर हैदराबाद संस्थानात होतं ते आरक्षण द्या, असं आमचं म्हणणं आहे.
प्रश्न मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतरही आंदोलन सुरू का ठेवलं?
उत्तर : त्यांनी फोन केला, की आता आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. मी आरक्षण देतो. त्यावर मी म्हणालो, साहेब तुमच्या समितीनं अहवालच दिलेला नाही. त्यावर असं असेल तर मी आत्ताच्या आत्ता समितीला बोलावतो आणि तुम्ही अहवाल केलाय का ते विचारतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते पुन्हा फोन करतो म्हणाले, एका तासात केला नाही आणि आता आमच्यावर थेट हल्लाच झाला.
प्रश्न पोलिस म्हणतात, तुमची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात नेणं गरजेचं होतं?
उत्तर : आता काल तब्येत खालावली म्हटल्यावर मी आज तर बोलतोय. मी जर बोलू शकतो, तर तब्येत खालावली कोणाची? तरी मी एसपींना सांगितलं, की तुम्हाला काय ट्रीटमेंट करायची ती करा. तयार झाले, त्यांनी डॉक्टर आणले, माझ्या सगळ्या तपासण्याही केल्या. तब्येत चांगली राहण्यासाठी मला पाणीही प्यायला लावलं. तुम्ही उपचार घेतले, आम्ही खूश झालो आणि चाललो, असं म्हणाले. दोनशे मीटरवर गेले आणि एकाएकी ५०० पोलिसांचा ताफा आला आणि लोकांना मारायला लागला, याचं काय कारण?
प्रश्न आंदोलन चिघळलं कसं?
उत्तर : हे आंदोलन लाठीचार्जमुळे राज्य सरकारनं चिघळवलं. सरकारला मराठ्यांना काहीच द्यायचं नाही. म्हणून यांनी जाणूनबुजून हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला.