आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:57 AM2019-11-08T00:57:27+5:302019-11-08T00:57:38+5:30

येत्या आठवड्यापासून शहरातील जनतेला आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.

 There will be water supply twice a week | आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होणार

आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नवीन जालना भागातील जलशुध्दीकरण केंद्राच्या दुुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. घाणेवाडी येथील जलाशयातील पाणी या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचले असून, येत्या आठवड्यापासून शहरातील जनतेला आठवड्यातून दोनवेळा पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.
गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने घाणेवाडी जलाशय कोरडाठाक पडला होता. त्यामुळे नवीन जालना भागाला देखील जायकवाडी योजनेद्वारेच पाणी पुरवठा केला जात होता. परतीच्या पावसामुळे घाणेवाडी जलाशय तुडुंब भरला आहे. परंतु, वर्षभरापासून घाणेवाडीची जलवाहिनी बंद होती. त्यामुळे नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणारे जलशुध्दीकरण केंद्र देखील बंद पडले होते. या जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम जालना पालिकेतर्फे सुरु करण्यात आले असून, पाणी शुध्दीकरणासाठी लागणारा ब्लिचिंग पावडरचा साठा मागवण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी विद्यमान आ. कैलास गोरंट्याल यांनी शहराला आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. जलशुध्दीकरण केंद्राचे काम झाल्यानंतर दिलेल्या आश्वासनानुसार पुढील आठवड्यापासून आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेने केले ४८ एमएलडी पाण्याचे नियोजन
अंबड येथे जायकवाडी- जालना योजनेच्या कामादरम्यान तयार करण्यात आलेले २४ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र आणि त्याच ठिकाणी शहागड- जालना या योजनेदरम्यान कार्यान्वित करण्यात आलेले १५ एमएलडी क्षमतेच्या नादुरुस्त असलेल्या जलशुध्दीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे.
त्यामुळे या दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रांच्या माध्यमातून जालना शहराला पाणीटंचाईच्या कालावधीत एकूण ४८ एमएलडी पाणीपुरवठा करता येईल, असे नियोजन जालना पालिकेतर्फे करण्यात आले आहे. शहरातील जलशुध्दीकरण केंद्रांतर्गत ६ एमएलडी आणि अंबड येथील जलशुध्दीकरण केंद्रांतर्गत १८ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

Web Title:  There will be water supply twice a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.