"यांना दैवत कळत नाही,कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका"; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 07:23 PM2024-08-26T19:23:13+5:302024-08-26T19:24:53+5:30
उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे, काम करणारेच नीट नसले तर ते काय करणार: मनोज जरांगे
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : स्मारकाचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कोणीतरी नेताच असणार, कशातही पैसै खायची सवय लागली यांना, सगळ्यांना जेलमध्ये टाका सोडू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर दिली. हे लोक चांगले काम करत नाहीत. यांना पुतळे कळत नाही, दैवत कळत नाही, छत्रपती शिवराय देशाचे दैवत, ते हिंदू धर्माची अस्मिता आहेत, असे म्हणत जरांगे यांनी आता मोदी साहेबांनी छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन केल होत हे विसरून जाऊ नका, ध्यानात ठेवा, असा टोलाही लगावला.
जरांगे पुढे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात. यांना कशात खाव हे सुद्धा कळत नाही. कोण कॉन्ट्रॅक्टर, कोणी उद्घाटन केलं, मोदी साहेबांना उद्घाटन केल म्हणतात. ते इतक्या अडचणीत कुठे गेलते. इतक्या लांब आता त्यांना दोष देऊन उपयोग नाही. उद्घाटकाचा काय दोष आहे, काम करणारेच नीट नसले तर ते काय करणार, असे म्हणत जरांगे यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुनावले. परंतू हे असले लोक ज्यांना छत्रपती शिवरायांचा पुतळा कळत नाही त्यांना सोडलेच नाही पाहिजे. यांना एकदाच अद्दल घडायला पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली.
पुतळे, स्मारकावरून राजकारण्यांना खडेबोल
पुतळ्याची देखरेख करण गरजेच आहे. नुसता पुतळा उभा केला की प्रशासन ही मोकळ होत. प्रत्येक ठिकाणी असेच आहे. निवडणुका झाल्यानंतर छत्रपती शिवरायांचे सरकार येण्यासाठी आशीर्वाद घेतलेला आहे. आता नुसते उद्घाटन उद्घाटन निवडणुका निवडणुका सुरू आहे. दैवताचे अपमान करू नका. छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक, इंदू मिलचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात फक्त निवडणुका आल्यावर बोलायचं, हे बंद करा आता, असे खडेबोल जरांगे यांनी राजकारण्यांना सुनावले.