चोरी केल्यानंतर केसांचा विग लावणारा चोरटा जेरबंद
By दिपक ढोले | Published: July 30, 2023 06:28 PM2023-07-30T18:28:05+5:302023-07-30T18:28:20+5:30
अंबड शहरासह तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अंबड पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. मुस्तफा अब्दुल सय्यद (२५ रा. चंदनझिरा, जालना) असे संशयिताचे नाव आहे.
जालना: अंबड शहरासह तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अंबड पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. मुस्तफा अब्दुल सय्यद (२५ रा. चंदनझिरा, जालना) असे संशयिताचे नाव आहे. तो चोरी केल्यानंतर डोक्यावर बनावट केसांचा विंग लावून फिरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंबड शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या गुन्ह्यांचा तपास करीत असताना, एक व्यक्ती पाचोड रोडवरील भालचंद्र पेट्रोलपंपाजवळ चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती परीविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक चैतन्य कदम यांना मिळाली.
या माहितीवरून पोलिसांनी सापळा लावला असता, एक विना क्रमांकाच्या दुचाकीवरून एकजण येत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याला थांबण्याचा इशारा केला असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. त्याची विचारपूस केली असता, त्याने अंबड, पैठण, पाचोड, जालना येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून लॅपटॉप, रेडिमेड कपडे, गॅस कटर, गॅस टाकी, दुचाकी, स्कुटी, ॲटो रिक्षासह हार्डवेअर, ॲटोपार्ट जप्त केला आहे. तो टकला असून, चोरी केल्यानंतर डोक्यावर बनावट केसांचा विग लावून फिरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परीविक्षाधिन पोलिस उप अधीक्षक चैतन्य कदम, पोउपनि अदिनाथ ढाकणे, पोहेकॉ. विष्णू चव्हाण, दीपक पाटील, स्वप्नील भिसे, वंदन पवार, मनजितसिंग सेना, राम मते, अरूण लहाने यांनी केली आहे.