जालना जिल्ह््यात चोरटे पुन्हा सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:47 AM2019-04-09T00:47:59+5:302019-04-09T00:48:05+5:30
जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. घनसावंगी तालुक्यातील चित्रवडगाव येथे धाडसी चोरी झाली असून यात सात लाख रूपयांची रोख रक्कम आणि सोने- चांदीचे दागिने लंपास केले आहेत. तर दुसऱ्या घटनेत तीर्थपुरी येथे देखील रविवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घनसावंगी तालुक्यातील चित्रवडगाव येथील गंगाधर आप्पासाहेब सोसे यांचे कुटुंब रविवारी रात्री झोपलेले होते. दरम्यान दोन ते अडिचच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरातून रोख सात लाख रूपये, चार तोळे सोने व दहा ग्राम चांदीचे दोगिने व एक महागड्या कंपनीचा मोबाईल लंपास केले. ही चोरी केल्यानंतर चोरट्यांनी शेजारील विलास सोसे यांच्या दारात असलेली एक दुचाकी व डॉ. ढाकणे यांची दुचाकी (क्र. एम. एम. २१ बीए. ०२४०) या पळविल्या. यातील सोसे यांच्या दुचाकीचे पेट्रोल रांजणी जवळील तांड्याजवळ संपले. यानंतर ती दुचाकी तिथे लावून चोरट्यांनी तेथून पुन्हा तिसरी दुचाकी पळविली. हा सर्व प्रकार सोमवारी सकाळी लक्षात येताच ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर जालना येथील पोनि. यशवंत जाधव व ठसे तज्ज्ञ यांनी घटनास्थळी भेट दिली. ढोबळेवाडी रस्त्यावर चार किमीपर्यंत श्वानाने माग काढला. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड करत आहेत.
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील आरोग्य केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी बळीराम शिंदे व भगवान गायकवाड यांच्या घरीही चोरट्यांनी दोन लाख ३३ हजार रूपयांची चोरी केली . यापूर्वीही खापरदेव हिवरा येथेही चोरी झाली होती. मात्र, अद्याप या चोरीचा पोलिसांना तपास लागलेला नाही. बळीराम शिंदे हे शहागड रस्त्यावरील शिवतीर्थ लॉनच्या बाजूला राहतात. चोरट्यांनी सोमवारी पहाटे त्यांच्या दरवाज्याच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटाच्या रूमचे कुलूप तोडून कपाट उचलून नेले. त्याची तोडफोड जवळच असलेल्या मापारे यांच्या शेतात केली.
यानंतर त्यातील दोन गंठण पाच तोळ््याचे, झुंबर, वेल असा एक लाख ७० हजार रूपयांचा ऐवज व नगदी पंचवीस हजार रूपये चोरला. तसेच येथील भगवान गायकवाड यांच्या मळ््यातील रूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० हजार रूपयांचे सोने व रोख तीन हजार रूपये लंपास केले आहेत. या घटनेचा पोलीस कॉन्स्टेबल श्रीधर खंडेकर यांनी पंचनामा केला.