भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या मालकीच्या कार्यालयात चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:14 PM2018-12-08T12:14:02+5:302018-12-08T12:14:53+5:30
चोरट्यांनी रोख रक्कम व सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केला आहे.
जालना : भोकरदन नाका परिसरातील भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या मालकीच्या शालेय पोषण आहर वितरीत करण्याऱ्या कार्यालयात आज पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पहाटे २.३० वाजेच्या दरम्यान झालेल्या या घटनेत चोरट्यांनी रोख रक्कम व सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील भोकरदन नाका परिसरातील सकलेचा नगर येथे खासदार रावसाहेब दानवे यांच्या मालकीचे शालेय पोषण आहर वितरीत करण्यारे कार्यालय आहे. आज पहाटे २.३० वाजेच्या दरम्यान, चोरट्यांनी येथील वॉचमनला बेदम मारहाण करत आत प्रवेश केला. आत सामानाची तोडफोड करत त्यांनी रोख ४० हजार येथून लंपास केले. तसेच चोरट्यांनी कार्यालयाचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडून डीव्हीआरसह येथून पळ काढला.
या भागात चोरीच्या घटना वाढल्या असून चोरट्यांनी आता भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या कार्यालयातच चोरी केल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
चोरीची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, डीवायएसपी शिलवंत ढवळे, गुन्हे शाखेचे पो.नि. राजेंद्रसिंह गौर, पोनि जाधव, सदर बाजारचे पोनि. महादेव राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी श्वानपथक, ठसे तज्ञ यांच्या सोबत तपास सुरु केला आहे.