कीर्तनाला गेलेल्या व्यक्तीचे घर चोरट्यांनी फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:58 AM2019-10-18T00:58:30+5:302019-10-18T00:58:56+5:30
इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेलेल्या एका भाविकाचे घर चोरट्याने फोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेलेल्या एका भाविकाचे घर चोरट्याने फोडले. ही घटना परतूर येथील रेणुकानगर भागात बुधवारी रात्री घडली असून, या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतूर शहरातील रेणुकानगर भागात राहणारे सिध्देश्वर अंजीराम बिल्हारे हे बुधवारी रात्री घराला कुलूप लावून निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटाचा पत्रा उचकटून आतील सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह ३ लाख ६६ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.
बिल्हारे हे कीर्तन संपल्यानंतर घरी आले. त्यावेळी हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच परतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी सिध्देश्वर बिल्हारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि माने हे करीत आहेत. दरम्यान, चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.
दुचाकीवर विदेशी दारूची वाहतूक; दोघाविरूद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुचाकीवरून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाºया दोघांविरूध्द सदरबाजार पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई गुरूवारी दुपारी करण्यात आली असून, यावेळी ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुचाकीवरून अवैधरित्या विक्रीसाठी विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोनि संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरूवारी दुपारी प्रकाश हॉटेलसमोर दुचाकी (क्र.एम.एच. २१- बी.ए.९१००) थांबवून चौकशी केली. त्यावेळी दुचाकीवरील दोघांकडे ३४ हजार २५० रूपयांची विदेशी दारू आढळून आली. या प्रकरणी पोकॉ मनोज काळे यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात किशोर उत्तमराव बनकर, गजेंद्र भगवानराव बंगड या दोघांविरूध्द तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.