'चोरांनो, आधी हे वाचा!'; जालन्यात वकिलाने चोरांसाठी लिहिलं पत्र अन् चमत्कारच झाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 11:58 IST2025-04-16T11:58:20+5:302025-04-16T11:58:44+5:30

जालन्यात वकिलांनी घरावर लावलेलं हे पत्र चर्चेचा विषय ठरत आहे. काही लोकांनी याची छायाचित्रंही सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

'Thieves, read this first!'; A lawyer in Jalna wrote a letter for thieves and a miracle happened! | 'चोरांनो, आधी हे वाचा!'; जालन्यात वकिलाने चोरांसाठी लिहिलं पत्र अन् चमत्कारच झाला!

'चोरांनो, आधी हे वाचा!'; जालन्यात वकिलाने चोरांसाठी लिहिलं पत्र अन् चमत्कारच झाला!

जालना: घरी सतत होत असलेल्या चोऱ्यांमुळे हैराण झालेल्या जालना शहरातील एका वकिलाने चक्क चोरांसाठी एक खास पत्र लिहून ते आपल्या घरावर लावलं आहे. आश्चर्य म्हणजे, योगायोग म्हणावा की आणखी काही मात्र, पत्र घरावर लावल्यापासून त्यांच्या घरी चोरट्यांनी पुन्हा पाऊलही टाकलं नाही!

रेल्वेची हद्द, ख्रिश्चन स्मशानभूमी आणि मोकळा परिसर यांच्यामध्ये असलेल्या एसटी कॉलनीतील जुन्या घरात  अॅड. ललित हट्टेकर आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहतात. त्यांच्या आईचं नुकतंच निधन झालं असून, त्याच दुःखात तीन चोऱ्यांचा सामना त्यांनी केला. सहा महिन्यांत एकदा मोठी चोरी झाली, तर इतर वेळी चोरांना काहीच मिळालं नाही. शिवाय एकवेळा पोलिसांत तक्रार केली, पोलिस चोरांना पकडू शकले नाहीत. उलटे त्यानंतर पुन्हा दोन वेळ चोरी झाली. या सर्व चोऱ्यांमुळे त्रस्त होऊन, त्यांनी थेट चोरांनाच उद्देशून एक पत्र लिहिलं आणि ते घरावर अडकवले आहे.

आता घरात काहीच नाही...
'माननीय चोरसाहेब, सस्नेह नमस्कार!' अशा शब्दांनी पत्राची सुरुवात केली असून, त्यांनी त्यामध्ये चोरांच्या ‘कले’चे कौतुक करत त्यांना विनंती, सूचना आणि सौम्य धमकीही दिली आहे. 'आता घरात काही नाही, तुमचा आणि आमचा वेळ वाया जाऊ नये,' अशी खंत त्यांनी पत्रातून मांडली. तसेच जर जागा आवडली असेल तर आईचे वर्षश्राद्ध झाल्यानंतर एक वर्षांनी विकू शकतो, गैरधंद्यासाठी वापरा, अशी ‘ऑफर’ही वकिलांनी चोरांना दिली आहे.

पत्र लावले तशी चोरी नाही
इतकंच नाही तर, ''शस्त्र परवाना आहे, त्यामुळे विचार करा" असा अप्रत्यक्ष इशारा देखील अॅड. हट्टेकर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, ही मात्रा लागू पडली असून या 'स्नेहपूर्ण' निवेदनानंतर चोरांनी पुन्हा तिथे चोरी केली नाही. त्यामुळे, "हे पत्र खरोखर उपयोगी ठरलं," असं हट्टेकर सांगतात. दरम्यान, जालन्यात वकिलांनी घरावर लावलेलं हे पत्र चर्चेचा विषय ठरत आहे. काही लोकांनी याची छायाचित्रंही सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

वकिलांनी लिहिलेलं पत्र त्यांच्याच शब्दात, 

''मा. चोरसाहब, सस्नेह नमस्कार !

मी आपली जोखीम, तंत्रज्ञान, समन्वय, जीवावर उदार होऊन चोरी करण्याच्या कलेला वंदन करतो, खूप अवघड काम आहे हे.

मला तुम्हाला सांगावयाचे आहे परंतु आपली ओळख नसल्यामुळे हे निवेदन करतो की, गेल्या ६ महिन्यात तुम्ही ४ वेळा माझ्यासारख्या मानसाकडे आला. ३ वेळा तुमच्या पदरी निराशाच पडली. मात्र एक वेळ माझ्याकडून खूपकाही येऊन गेला. मी माझ्या आयुष्यभर ते परत कमऊ शकत नाही. त्याच वेळी मी पोलिस स्टेशन येथे तक्रार केली. परंतु तुम्हाला पोलिस पकडू शकले नाही. ३ वेळा तक्रार सुद्धा केली नाही.

माझी वकिली फक्त माझा व कुटूंबाचा योगक्षेम चालावा इतकीच आहे. मानानी आणि स्वाभिमानानी जगता यावे इतकेच पैसे मी कमावतो. मला सगळे रोग आहे त्याच्या गोळ्याचा, औषधाचा खर्च जवळपास १०,०००/- रु . होतो.

तुमच्या मुळे जे तुम्ही दरवाजे, कोंडे तोडता व निघून जाता त्यामुळे मला विनाकारण खर्च होतो व पत्नी, मुलगा दहशतीत जगतात, मला तुमच्यामुळे दोन दरवाजे १५,०००/- रु., लोखंडी कपाट दुरुस्ती ४५००/-, सी. सी. टी. व्ही.-२७,०००/- लोखंडी ग्रील ४१० किलोचे व मजुरी असे मिळून ३५०००/- रु. हा खर्च झाला आहे. कॅमेरे जे काढल्यानंतर काहीच ऊपयोग होत नाही ते सुद्धा तुम्ही २ वेळेला नेले. त्याचा ६,०००/- रु. खर्च झाला. त्या सर्वांची उधारी मी आज सुद्धा देत आहे.

माझे घर एका कोपऱ्यात आहे. आजुबाजुला मोठ्या-मोठ्या भिंती आहेत व समोर मोकळी जागा आहे. त्यामुळे तुम्हाला चोरीसाठी एक आदर्श जागा वाटते. तुम्हाला कोणाला वाटत असेल तर मी जागा सुद्धा तुम्ही जर माझी लाळ पडेल इतकी रक्कम सांगीतली तर १ वर्षानंतर विकू शकतो (माझे आईच्या वर्ष श्राद्ध झाल्यानंतर) इथे ६००० चौ. फुट मध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे अवैध धंदे करु शकता. कोणतीही रिस्क नाही. सेफ आहे. बघा विचार करुन.

अजुन एक राहिले समोरचा खंबा हा पुर्ण पाण्यात आहे. त्या रस्त्याने जाऊ नका, अर्थिग करंट लागतो. मी लाईट लावायला गेलो होतो तेव्हा मला जोरात झटका बसला होता.

आता महत्वाचे माझ्याकडे शस्त्र परवाना आहे, जर तुमच्या दुर्दैवाने तुम्ही सापडला तर मी मारता मारता मरेण या तत्वाने त्याचा उपयोग करेल व विनाकारण मला जीव हत्येचे पाप लागेल. आता माझ्याकडे सोने-चांदी-पैसे वगैरे काहीही नाही. घरात फक्त मी, बायको, मुलगा, भांडे-कुंडे, कपडे, फ्रीज, वॉशिंग मशिन, टी.व्ही. गाडी तिही टी.व्ही.एस. तीला पुर्नमुल्य नाही. २ मोबाईल आहे. तरी तुमचा वेळ व माझा संयम दोन्हीही वाया घालवू नका ही हात जोडून विनंती.

करिता हे नम्र निवेदन

ता. क. : तुम्ही चोर जरी असलास तरी तुम्हाला वाचता नक्की येते ही माझी खात्री व विश्वास आहे.''

Web Title: 'Thieves, read this first!'; A lawyer in Jalna wrote a letter for thieves and a miracle happened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.