जालनेकरांनो, विचार करा अन् घरातच बसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:41 PM2020-03-24T23:41:08+5:302020-03-24T23:44:34+5:30
इंग्रज राजवटीतील स्वातंत्र्य लढा असो किंवा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा असो; यात जालनेकरांनी दिलेल्या योगदानाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली
जालना : इंग्रज राजवटीतील स्वातंत्र्य लढा असो किंवा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा असो; यात जालनेकरांनी दिलेल्या योगदानाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक वारसाही मोठा लाभला आहे. प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी जालनेकर एकत्रित येतात, हे इतिहास सांगतो. मात्र, डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना विषाणूबाबत अनेक जालनेकर गंभीर का नाहीत, हाच प्रश्न आहे.
जालनेकरांनो आपल्या सर्वांच्या सुदैवाने मंगळवारी २४ मार्च रोजी सायंकाळपर्यंत तरी कोरोनाची लागण झालेला एकही रूग्ण आढळून आलेला नाही. जालना जिल्ह्यात आजवर ५२ संशयित जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल झाले आहेत. पैकी ४२ जणांच्या स्वॅबचे अहवालही सुदैवाने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह अवघी प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहे. जनता कर्फ्यू पाळणा-या जालनेकरांनी सोमवारी कलम १४४ चे पालन न करता रस्त्यावरील रहदारी कायम ठेवली. राज्याची स्थिती अशीच असल्याने सोमवारी सायंकाळी संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, जालनेकरांची मंगळवारची सकाळ नेहमीप्रमाणेच वर्दळीने सुरू झाली. दुकाने बंद असली तरी रस्त्यावरील रहदारी कायम होती. जीवनावश्यक वस्तंूची खरेदी करताना एकच गर्दी आणि त्यातही सुरक्षात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात होते. कोरोना विषाणूमुळे चीन, इटली, जपान, स्पेन, अमेरिका अशा प्रगत राष्ट्रांचे कंबरडे मोडले आहे. त्या तुलनेत आपल्याकडे सोयी-सुविधांचा अभाव आहे. जालना जिल्ह्यात केवळ आणि केवळ २५ व्हेंटिलेटर आहेत. दुर्दैवाने कोरोनाचा फैलाव झाला आणि परिस्थिती बिकट झाली तर उपचारासाठी यंत्रणाही तोकडी पडणार आहे. त्यामुळे कोरोनाची लागणच होऊ नये, यासाठी शासन निर्देशानुसार जिल्हा प्रशासन अहोरात्र आवश्यक ती पावले उचलत आहे. त्यामुळे कोरोना विरूध्दच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी आपण स्वत: शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत घरातच राहिलेले बरे. नागरिक रस्त्यावर उतरले तर पोलिसांना हातात दांडूका घेऊन उभे राहावे लागेल, गुन्हे दाखल करावी लागतील ? आणि ही बाब सर्वसामान्यांनाच परवडणारी नाही. कोरोनाचा लढा काही एक दोन माणसांसाठी नाही तर संबंध मानव जातीसाठी आहे. त्यामुळे कृपा करून जालनेकरांनी घराबाहेर पडू नये, गल्ली बोळातही एकत्रित येऊन गप्पा मारू नयेत, हीच अपेक्षा! शासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात झाला तर परिस्थिती काय होईल ? याचा विचार करा. चीन, इटली, स्पेन इ. देशांतील स्थितीचा विचार करा आणि घरात बसा अन्यथा मोजक्याच दिवसात जालन्याची अवस्था चीनमधील वुहान सारखी व्हायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की...!