तिसऱ्या दिवशीही मजुरांचे कामासाठी आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:35 AM2019-02-07T00:35:03+5:302019-02-07T00:35:47+5:30
शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद जालना येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने परतूर मंठा घनसावंगी तालुक्यातील मनरेगाची कामे मागणी केलेल्या गावात दुष्काळ असल्याने तात्काळ मनरेगाची कामे सुरु करून मनरेगा मजुरांना कामे द्या व कायद्यानुसार बेरोजगार भत्ता वाटप करा मागणीसाठी ४ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद जालना येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असतानाही प्रशासनाला जाग येईना.
मागील तीन ते चार महिन्यांपासून १३ हजाराच्या वर मजूर व शेतकरी मनरेगाच्या कामासाठी सतत संघर्ष करीत आहे. परंतु जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी हे मजुरांना सहकार्य करत नाहीत ते केवळ जेसीबी मशिनला सहकार्य करत आहेत. जलयुक्तच्या नावाखाली जिल्हाधिकारी हे जलयुक्तचे चेरमन आहेत. जिथे मजुरांनी कामाची मागणी केली आहे, तिथे ते काम मजुराला द्यावे परंतु ते काम जेसीबी मशिनला दिले आहे. माव(पाटोदा ), लिखित पिंप्री, ता. परतूर यासह अशीच परिस्थिती जिल्हाभर आहे. मजूर काम मिळविण्यासाठी सतत संघर्ष करीत आहे. त्यांना काम नाही. परंतु गुत्तेदाराच्या जेसीबी मशिनला त्वरीत काम मिळते. या सर्व अन्यायाविरुद्ध मजुर सोमवारपासून आंदोलन करत आहेत.
या आंदोलनात आण्णा सावंत, मारोती खंदारे, विनोद गोविंदवार, बंडू कणसे, लता काळदाते, दत्त्ता भदर्गे, विश्वनाथ कोरडे, सरस्वती कोरडे, मंजुळा जावळे, रुक्मिणी कोरडे, भिमराव मिसाळ, बाजीराव गायखै, शे. मुसा आदींचा सहभाग आहे.