तिसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:24 AM2019-09-20T00:24:10+5:302019-09-20T00:24:25+5:30
जिल्ह्याच्या विविध भागात सलग तिस-या दिवशी गुरूवारी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / भोकरदन : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात सलग तिस-या दिवशी गुरूवारी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात १९.६ मिमी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यात ५५.१३ मिमी, तर अंबड तालुक्यात ४०.५७ मिमी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातील बहुतांश नद्या तुडुंब वाहत असून, प्रकल्पांची पाणीपातळी वाढत आहे. तर पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
भोकरदन तालुक्यातील धावडा, पारध, पिंपळगाव रेणुकाई, वालसावंगी, जळगाव सपकाळ, आन्वा, वाकडी, हिसोडा, दानापूर या भागात प्रारंभीपासून चांगला पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यात झालेल्या पावसामुळे या भागातील जुई, धामणा, पद्मावती या मोठ्या प्रकल्पांसह पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे ओसंडून वाहत आहेत.
तालुक्यातील रायघोळ, नदीला आलेल्या पुरामुळे पारध येथील गणेश वस्तीमध्ये पाणी शिरले होते. धामणा धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे शेलूद येथील दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्पातून केळना नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू असल्यामुळे केळना नदीला आलेल्या पुरामुळे भोकरदन- आलापूर हा रस्ता तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गोकुळ, प्रल्हादपूर, वाडी या गावांना आन्वा रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्याचप्रमाणे दावतपूर ते टाकळी मध्ये असलेल्या पुलावर केळना नदीच्या पुराचे पाणी असल्यामुळे तीन दिवसांपासून या गावाचाही संपर्क तुटला आहे. शिवाय जुई, रायघोळ, धामणा, केळना या नद्यांना पूर आला होता.
भोकरदन तालुक्यातील अर्ध्या भागात झालेल्या पावसामुळे दोन-तीन वर्षाच्या पावसाची सरासरी सुध्दा यावर्षी पावसाने ओलांडली आहे. तालुक्यात १८ सप्टेंबर पर्यंत ६०६़५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १८ सप्टेंबर रोजी सर्वाधिक पाऊस धावडा मंडळात झाला असून, एकाच दिवशी या मंडळात १४७ मिमी पाऊस झाला. तर भोकरदन ३७, हसनाबाद ४०, सिपोरा बजार ४२, आन्वा ७०, पिंपळगाव रेणुकाई ६०, केदारखेडा २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हायवा नदीपात्रातच
भोकरदन : लिंगेवाडी येथील केळना नदीच्या पुलावरून वाहून गेलेला हायवा (क्र. एम.एच.२१- बी.एच. ७७००) गुरूवारी नदीपात्रात दिसून आला. मात्र, पाण्यातून हा हायवा बाहेर काढायचा कसा, असा प्रश्न संबंधितांना पडला आहे.