कृत्रिम पावसाचा तिसरा प्रयोग पावला; घनसावंगी तालुक्यात रिमझीम बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:58 PM2019-08-20T23:58:48+5:302019-08-20T23:59:31+5:30
जालना , औरंगाबाद : मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग ९ तारखेला सुरु झाला. मंगळवारी प्रयोगाचा बारावा ...
जालना, औरंगाबाद : मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागांत कृत्रिम पावसाचा प्रयोग ९ तारखेला सुरु झाला. मंगळवारी प्रयोगाचा बारावा दिवस होता. या बारा दिवसांत फक्त तीन दिवस विमान प्रयोगासाठी हवेत झेपावले. मंगळवारी विमानाने घनसावंगी परिसरात रसायनांची (एरोसोल्स) फवारणी केली आणि अखेर रिमझिम का होईना पाऊस बरसला. प्रत्यक्ष किती पाऊस झाला याचा अहवाल मात्र रात्री
उशिरापर्यंत विभागीय प्रशासनाकडून मिळाला नाही.
९ आॅगस्ट रोजी कृत्रिम पावसासाठी ‘ट्रायल रन’ घेण्यात आले. त्या दिवशी पश्चिम भागासह वैजापूर (जि. औरंगाबाद) परिसरात एका ढगावर फवारणी केली. मात्र, पाऊस झाला नाही. त्यानंतर एकच दिवस प्रयोग झाला. दोन दिवस फवारणीचे विमान विश्रांतीसाठी पुणे आणि दिल्लीला नेण्यात आले. दरम्यान १७ आॅगस्ट रोजी परदेशातून विमान औरंगाबादेत आले. सोमवारी काही परवानग्या न मिळाल्याने विमान उड्डाण घेऊ शकले नाही. रविवारी दिवसभर प्रयोगाबाबत शास्त्रज्ञांनी चर्चा केली.
मंगळवारी सी-डॉप्लर रडारवरून मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे उड्डाण घेण्याचा निर्णय झाला. दुपारी पुन्हा बैठक झाल्यानंतर सायंकाळी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात पाणीदार ढग असल्याचे दिसून आले. पाच वाजेच्या सुमारास विमानाने उड्डाण घेत साडेपाच वाजेच्या सुमारास ढगांवर रसायनांची फवारणी केली. ढगावर रसायनांची फवारणी केल्यानंतर १५ मिनिटे ते एक तासाने पाऊस पडतो. त्यानंतर पाऊस पडला की नाही, याची नोंद प्रशासनाकडे झालेली नाही. बुधवारी पाऊस झाला की नाही, याची माहिती मिळेल, असे नोडल आॅफिसर तथा विभागीय उपायुक्त सतीश खडके यांनी सांगितले.
घनसावंगी तालुक्यातील रूई, भार्डी खापरदेव हिवरा आणि वडेकाळेगाव परिसरात ग्रामस्थांनी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान हे विमान पाहिले. या विमानाच्या घिरट्यानंतर रिमझिम पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या पंधरा दिवसांपासून जालना जिल्ह्यात पावासाने दडी मारली आहे. अर्धा पावसाळा संपल्यावरही सरारीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारकडून मराठवाडा विभागात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी केली होती. परंतु या-ना त्या कारणाने यालाही विलंब होत गेल्याने शेतकऱ्यांच्या या कृत्रिम पावसावरील विश्वासही उडाला होता. मंगळवारी सायंकाळी घनसावंगी तालुक्यातील काही गावांत पाऊस झाल्याने शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेकांनी विमान पाहिलेही परंतु हे विमान कृत्रिम पावसाचेच होते काय याबद्दल शंका होती.
यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांना विचारले असता, त्यांनी ते विमान कृत्रिम पावसाचेच असल्याचे सांगितले. आम्हालाही औरंगाबादेतून जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग झाल्याचे सांगण्यात आल्याचे वायाळ म्हणाले.
‘त्या’ प्रकरणाची दखल
विभागात काही ठिकाणी ढग दाटून येत आहेत. त्यामुळे विमान उड्डाण घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे. कृत्रिम पावसाला यश मिळावे, विभागात पाऊस पडावा, अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. सोमवारी दिवसभर मराठवाड्यातून आयुक्तालयातील लॅण्डलाईनवर कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी फोन येत होते. सोशल मीडियात एका एसएमएसमुळे हा सगळा प्रकार घडला होता. याप्रकरणाची प्रशासनाने गभीर दखल घेतली आहे.